Breaking

मंगळवार, ८ डिसेंबर, २०२०

करमाळा तालुक्यात बिबट्याचा तिसरा बळी,चिखलठाण येथे ऊसतोड कामगाराच्या नऊ वर्षाच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू.


चिखलठाण  येथे ऊस तोड कामगाराच्या नऊ वर्षाच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

करमाळा तालुका प्रतिनिधी-
(अतुल वारे पाटील)


  करमाळा तालुक्यात बिबट्याचा हैदोस सुरूच असून सोमवारी चिकलठाण येथे ऊस तोड कामगाराच्या नऊ वर्षाच्या मुलीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
   चिखलठाण नं.1 (ता.करमाळा) येथे ऊस तोड कामगाराच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला. ही मुलगी ओरडल्यानंतर ऊस तोडणाऱ्या कामगारांनी बिबट्यावर प्रतिहल्ला केला.त्यावेळी या मुलीस बिबट्याने सोडले. गंभीर जखमी झालेल्या नऊ वर्षाच्या मुलीस कुटीर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण उपचारापूर्वीच ती मृत झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अरचंद कोडली हे ऊस तोडण्यासाठी बारामती ॲग्रो साखर कारखान्याकडे आलेआहेत. बारामती ॲग्रो मार्फत सोमवारी (ता.8) जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांच्या ऊसाच्या फडात अरचंद कोडली व त्यांचे सहकारी ऊस तोडण्याचे काम करत होते.ऊसतोड कामगारा सोबतच फुलबाई नावाची नऊ वर्षाची मुलगी खेळत होती. अचानक दहा-साडेदहाच्या दरम्यान ऊसातून येऊन बिबट्याने हल्ला केला व तिला ओढून चालविले असता,ती मोठ्याने ओरडल्यावर ऊस तोडणाऱ्या सर्व मजुरांनी बिबट्यावर हल्ला केला असता बिबट्या तेथून पळून गेला. त्यानंतर त्या मुलीला तात्काळ कुटीर रूग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु तिला डॉक्टरांनी मृत म्हणून घोषित केले. 

ही घटना समजताच माजी आमदार नारायण पाटील,उपसभापती दत्ता सरडे,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड,सरपंच चंद्रकांत सरडे,तहसीलदार समीर माने,वनविभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी,पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे,पोलीस नाईक अनिल निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. 

वनविभागाच्या पथकाची बिबट्याशोध मोहीम अयशस्वी

 या घटनेनंतर वनविभाग, पोलीस प्रशासनास सदरचा बिबट्या याच परिसरात असल्याचे माहिती मिळताच वनविभागाने या बिबट्याला पकडण्याची मोहीम राबविली. या ठिकाणी कॅमेरा ट्रॅप, पिंजरे, बेशुध्दी पथक (Tranqualizing Gun सह ) व डॉग स्कॉड तसेच  ५ हत्यारी पोलिस, शस्त्रधारी वनरक्षक व शार्प शूटर यांनाही यावेळी उपस्थित केले होते.यावेळी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, तहसीलदार समीर माने, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड आदी जण उपस्थित होते. या मोहिमेसाठी ज्या ऊसाच्या फडात बिबिट्या शिरला होता. त्याची अधिकृत माहिती मिळताच वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी ऊसाच्या चारही बाजुंनी शार्प शूटर, तसेच बेशुध्दी पथक, कॅमेरा ट्रॅप अशी यंत्रणा उभा करण्यात आली. यानंतर सदरचा ऊस हा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांचा होता.  आमदार संजयमामा शिंदे यांच्या सूचनेवरून राजेंद्र बारकुंड यांनी तातडीने आपला ऊस पेटवून देण्यात आला. ऊस पेटविल्यानंतर उष्णतेची तीव्रता जाणविल्याने या दडून बसलेला बिबटा बाहेर आला. त्याला दिसता क्षणी शार्प शूटर यांनी गोळ्या घातल्या परंतु या बिबट्याने शेजारीच असलेल्या केळीच्या बागेत झेप घेऊन पळून गेला. त्यामुळे बिबट्याला पकडण्याची मोहीम अयशस्वी झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा