वीजबिल थकबाकी वसुलीची पध्दत न बदलल्यास रास्ता रोको आंदोलन...
संजय कोकाटे यांचा इशारा
टेंभूर्णी (प्रतिनिधी):- माढा विधानसभा मतदार संघातील वीजबिल थकबाकी वसुलीची सध्याची पध्दत न बदलल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदन शिवसेनेचे संजय कोकाटे यांनी जिल्हाधिकारी साहेब सोलापूर व अधीक्षक अभियंता महावितरण सोलापूर यांना दिले आहे.
सोमवार दिनांक २२/३/२०२१ रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत वसुलीची पद्धत न बदलल्यास वीजपुरवठा सुरू न केल्यास सकाळी ११ वाजता पुणे सोलापूर रोड छत्रपती संभाजी महाराज चौक (सोलापुर कडील बायपास चौक) येथे रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा कोकाटे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
सध्या सगळीकडे वीजबिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी जोरदार मोहीम सुरू आहे, वीजबिल वसूल व्हावे म्हणून पूर्णपणे लाईट बंद केली जात आहे. त्यामुळे ज्या लोकांनी पैसे भरले आहेत किंवा पूर्वीपासून रेग्युलर पैसे भरत आहेत अशा शेतकर्यांना विज मिळत नाही. एखाद्या डीपीवरील अर्धे शेतकरी पैसे भरण्यास तयार असतात तर अर्धे शेतकरी पैसे भरू शकत नाहीत त्या ठिकाणी शेतकर्यांमध्ये वाद निर्माण व्हायला लागले आहेत.
आपण एकट्याने पैसे भरून आपल्याला वीज मिळत नाही, म्हणून काही शेतकरी पैसे भरायचे थांबलेले आहेत; त्यामुळे वीज बंद करून थकबाकी वसुली करण्यापेक्षा वीज सुरू ठेवून थकबाकी वसुली करावी जे शेतकरी मुद्दामहून पैसे भरत नाहीत अशा लोकांची वीज खंडित करावी. या मोहिमेचा त्रास व नुकसान जे रेग्युलर पैसे भरतात व ज्यांची आता शासनाच्या मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा आहे अशा लोकांना होत आहे व स्वखर्चाने केलेल्या डीडीएफ योजनेतील शेतकर्यांचा काहीही दोष नसताना त्यांनाही नाहक त्रास होत आहे.
सध्या उन्हाळा खूप कडक असून सर्वच पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. विज बिल भरूनसुद्धा त्यांची पिके करपून जायला लागली आहेत, त्यामुळे त्यांच्या होणाऱ्या नुकसानीस महावितरण जबाबदार राहील. तसेच थकबाकीदार शेतकर्यांना बिलाचे टप्पे पाडून द्यावेत त्यांना सरकारची योजना चांगल्या पद्धतीने समजून सांगून त्यांना योजनेमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करावा.
तरी तातडीने वीजपुरवठा सुरू करावा व त्यानंतर थकबाकी वसुली मोहीम सुरू ठेवावी अशी मागणी निवेदनात केली आहे.
सदर निवेदनाच्या प्रती पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व टेंभुर्णी पोलिस स्टेशन ला दिल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा