Breaking

शनिवार, ८ जानेवारी, २०२२

दासगावच्या मासळी बाजारावर कोरोनाचे सावट घावूक व्यापारी देखील हबकले



दासगावच्या मासळी बाजारावर कोरोनाचे सावट घावूक व्यापारी देखील हबकले


महाड –   Milind mane

     महाड तालुक्यातील दासगाव गावात भरणाऱ्या मासळी बाजाराला गेली अनेक वर्षाची परंपरा आहे. यामुळे या परिसरात हा बाजार प्रसिद्ध आहे. मात्र गेली दोन वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा बाजार बंद होता. त्यातच आलेला पूर आणि पावसाळा याचा परिणाम देखील सुक्या मासळी विक्रीवर झाला. नुकताच हा बाजार पुन्हा सुरु झाला असतानाच कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आणि याचा परिणाम मासळी बाजारावर जाणवू लागला आहे. त्यातच सुक्या मासळीचे दर देखील गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह घावूक व्यापारी देखील हबकले आहेत.

     महाड तालुक्यातील दासगाव मधील आठवडी बाजार हा फक्त सुक्या मासळीसाठी प्रसिद्ध आहे. ब्रिटीशकाळात याठिकाणी बंदर होते. होडीच्या सहाय्याने याठिकाणी सुकी मासळी आणि इतर मालाची ने आन होत होती. या परिसरातील आणि महाड खाडीपट्टा ते थेट भोर, खानातून सुकी मासळी नेण्यासाठी याठिकाणी ग्राहकांची गर्दी असते. दिघी, म्हसळा, श्रीवर्धन आदी ठिकाणाहून सुकी मासळी याठिकाणी येते. चांगल्या दर्जाची सुकी मासळी दासगाव मध्ये मिळत असल्याने याठिकाणी आजदेखील कायम गर्दी असते. खिशाला परवडेल असा भाव या सुक्या मासळीला याठिकाणी असल्याने मोठ्या प्रमाणात याठिकाणी खरेदीला गर्दी असते. मात्र गेली दोन वर्षापासून याठिकाणी सुक्या मासळीच्या बाजारावर कोरोनाचे सावट दिसू लागले आहे. त्यातच सुक्या मासळीचे दर प्रतिवर्षाला चढत गेल्याने सर्वसामान्य माणूस या बाजारापासून दूर जात आहे.
     गेली आठवडाभरापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दासगाव परिसरात कोरोनाचे रुग्ण अद्याप जरी नसले तरी सुरवातीच्या काळात हा परिसर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चांगलाच हबकला होता. सद्य स्थितीत महाड तालुक्यात २६ च्या आसपास कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात घातलेल्या निर्बंधांमुळे महाड तालुक्यात देखील भीतीचे वातावरण तयार झाले आहे. यामुळे दासगाव मध्ये शनिवारी भरवल्या जाणाऱ्या सुक्या मासळीच्या बाजारावर कोरोनाचे सावट पसरले आहे.  

     याठिकाणी सोडा आजही चक्क ११०० रुपये, सुके बोंबील ६०० रुपये, अंबाडी देखील ४०० रुपये, कोलिम, वाकटी, मासे सुकट, आदींचे दर देखील पूर्वीपेक्षा दुप्पट झाले आहेत. यामुळे ग्राहक नाराज होवून जेव्हढे घेता येईल तेव्हढेच घेवून पाठ फिरवत आहेत. या बाजारावर आता घावूक व्यापाऱ्यांची नजर असल्याने ते याठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा