Breaking

बुधवार, ३ मार्च, २०२१

प्रत्येकाने आपापल्या कामावर निष्ठा ठेवून काम केल्यास सन्मान वाढतो - राजेंद्र गुंड सर अंजनगाव उमाटे येथे संत रविदास महाराजांची जयंती साजरी.



प्रत्येकाने आपापल्या कामावर निष्ठा ठेवून काम केल्यास सन्मान वाढतो - आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड

अंजनगाव उमाटे येथे संत रविदास महाराजांची जयंती साजरी

माढा / प्रतिनिधी - रेणुका रजपूत
क्षेत्र कोणतेही असो, प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रातील कामांवर मनापासून निष्ठा ठेवून काम केल्यास सन्मान तर वाढतोच परंतु त्याचबरोबर तुम्हाला आत्मिक आनंद व समाधान मिळते असे प्रतिपादन विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी केले.

ते अंजनगाव उमाटे ता.माढा येथे संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मानेगाव गणाच्या पंचायत समिती सदस्या सुजाता सिद्धेश्वर राऊत व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पुढे बोलताना माढा प्रेस क्लबचे उपाध्यक्ष राजेंद्र गुंड म्हणाले की,संत रविदास महाराजांनी तत्कालीन समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यांना जातीभेद अजिबात मान्य नव्हता.ते संत कबीरांचे गुरुबंधू होते.आजच्या पिढीतील युवकांनी त्यांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले.गावोगावच्या प्रस्थापितांनी युवा पिढीने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करावे आणि प्रोत्साहन दिले तर गावाची प्रगती अधिक वेगाने होण्यास मदत होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी नुतन सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना लक्ष्मण राऊत म्हणाले की,संत रविदास महाराज हे तत्कालीन जातीव्यवस्थेवर प्रहार करणारे संत होते.आजच्या युवा पिढीला सुसंस्कृत आणि संस्कारक्षम बनविण्यासाठी आई-वडिल व शिक्षक आणि थोर महापुरुषांचे विचार निश्चितच फायदेशीर ठरणार असल्याने असे उपक्रम गावोगावी राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी वडाचीवाडीचे सरपंच रमेश भोईटे,सरपंच माधुरी आदलिंगे, ग्रामसेवक सिद्धेश्वर राऊत,माढेश्वरी बॅंकेचे संचालक गणेश काशीद, तंटामुक्ती अध्यक्ष नानासाहेब उमाटे, आकाश दळवी,संयोजक राजेंद्र कांबळे,हनुमंत घोडके,रामहरी आदलिंगे,मार्तंड जगताप,सचिन कौलगे,महादेव काशीद,शिवाजी मुळे, सागर कौलगे,संदीप उमाटे,सिराज शेख,अमोल पाडुळे,शौकत पठाण, रामदास कांबळे,उत्रेश्वर खरात,प्रविण कांबळे,नारायण कांबळे,युवराज खरात,विकास कांबळे,ज्ञानेश्वर खरात,मुकुंद कांबळे,सुग्रीव आदलिंगे, धनाजी ओहोळ यांच्यासह ग्रामस्थ व युवक आणि महिला उपस्थित होते.

सूत्रसंचालन राजेंद्र कांबळे सर यांनी केले.आभार अमोल खरात यांनी मानले.

फोटो ओळी - अंजनगाव उमाटे ता.माढा येथे संत रविदासांच्या प्रतिमेचे पूजन करताना सुजाता राऊत,राजेंद्र गुंड,लक्ष्मण राऊत व इतर मान्यवर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा