Breaking

मंगळवार, २० एप्रिल, २०२१

जिल्हाधिकारी कार्यासमोर उपोषणाला बसणार - जि.प. सदस्य सुरेंद्र गुदगे*



जिल्हाधिकारी कार्यासमोर उपोषणाला बसणार - जि.प. सदस्य सुरेंद्र गुदगे*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

        कोटयावधी रुपये खर्चून खटाव तालुक्यातील पडळ व गुरसाळे येथे उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोना केअर सेंटर सुरू करण्याबाबत पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. त्यामुळे लोकांचे हकनाक बळी जात आहेत. येत्या चार दिवसात तेथे कोरोना केअर सेंटर सुरू न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा जि.प.सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी दिला आहे.
        सुरेंद्र गुदगे म्हणाले, गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच येथील मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये कोरोना केअर सेंटर आणि डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटर अशी दोन्ही केंद्रे निर्माण करण्यात आली होती. परिणामी खटाव तालुक्यातील कोरोना बाधितांवर वेळेत उपचार होऊन लोकांना दिलासा मिळत होता. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनाची लाट नव्हे तर त्सुनामी आलेली असताना ही कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले नाही. तालुक्यातील तरसवाडी ते औंध दरम्यानच्या पन्नास किलोमीटरच्या पट्टयात एक ही कोरोना केअर सेंटर नाही . त्यामुळे उपचारासाठी जनतेला सांगली, कोल्हापूर व पुणे या पर जिल्हयात जावे लागत आहे. मात्र तेथे ही बेड उपलब्ध होत नसल्याने उपचाराअभावी लोकांचे हकनाक बळी जात आहेत. त्यावर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी वारंवार चर्चा करण्यात आली आहे. तालुक्यात कोरोना केअर सेंटर आणि डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटर सुरू करण्याची आग्रही मागणी केली आहे. खटाव तालुक्यातील पडळ व गुरसाळे येथे चार - चार कोटी रुपये खर्चून सर्व सोयी सुविधांनी युक्त अशी प्राथमिक आरोग्य केंद्रे बांधण्यात आली आहेत. त्या आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना केअर सेंटर सुरू करण्यास प्रशासनाने हिरवा कंदील ही दाखविला आहे. त्या अनुषंगाने जबाबदार अधिकाऱ्यांशी सतत संपर्क साधून कारवाईबाबत मी स्वतः पाठपुरावा करीत आहे. मात्र ठोस निर्णय न घेता त्यांचे केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवत, वेळ काढूपणा करण्यात येत आहे. नुसतेच केंद्र यादीला घेतले आहे. त्यासाठी नोडल ऑफीसर नेमले आहेत. अशा प्रकाराची उत्तरे देऊन वेळ मारून नेली जात आहे. गेल्या काही दिवसापासून वडूज खटाव व औंध या ठिकाणी एक ही बेड उपलब्ध नाही. प्रशासनाने आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन, जनतेच्या जिवाशी न खेळता तातडीने कोरोना केअर सेंटर सुरू करावे. दरम्यान येत्या ४ दिवसात प्रशासनाकडून कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा निर्वाणीचा इशारा जि.प.सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी दिला आहे. दरम्यान खटाव तालुक्यात तातडीने कोरोना केअर सेंटर सुरू करण्यासाठी जातीने लक्ष घालून जिल्हाधिकारी यांना तसे आदेश द्यावेत. अशी मागणी ही जि.प. सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचेकडे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा