*अंगणात कोंबड्या गेल्यावर किरकोळ वादातून महिलेचा खून*
बारामती: अंगणात कोंबड्या आल्याच्या किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात महिलेला प्राण गमवावे लागले. डोक्यात कुऱ्हाडीने वार करत महिलेची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
गंगूबाई तात्याराम मोरे असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी किरण मोरे याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला आणि आरोपीचे घर समोरासमोर आहे. दोन्ही कुटुंबामध्ये अंगणात कोंबड्या येण्यावरुन आणि पाच फूटांच्या जागेवरुन वारंवार वाद होत होता.
डोक्यावर कुऱ्हाडीने वार
रविवारी दुपारी देखील याच कारणामुळे आरोपीच्या बायको सोबत गंगुबाई यांचा वाद झाला होता. यावेळी रागाच्या भरात किरण याने गंगूबाईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला. या हल्ल्यात गंगुबाई गंभीर जखमी झाल्या.
उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा