घोटी येथे नालसाहेबांच्या यात्रेस प्रारंभ ....
बेंबळे। प्रतिनिधी। फोटो
बेंबळे पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या घोटी ता. माढा येथे हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या 'नालसाहेब' या जागृत देवस्थानची यात्रा 23 ते 25 मार्चपर्यंत साजरी होणार असल्याची माहिती युवानेते राजाभाऊ बागल व सरपंच संजय वनवे यांनी दिली आहे. या यात्रेचे वैशिष्ट्य असे आहे की या ठिकाणी नाल साहेब म्हणून मुस्लिम देवस्थान आहे, या देवस्थानच्या चार सवार्या आहेत व यातील एक सवारी फक्त मुस्लिम घराण्यात असून इतर सवाऱ्या मराठा, माळी, लोहार अशा इतर समाजाच्या घराण्यात आहेत, मोहरमच्या सणाच्या वेळेस या सवाऱ्यांची मिरवणूक हा या पंचक्रोशीतील चर्चेचा विषय असतो, नवसाला पावणारा नालसाहेब म्हणून सर्वत्र ख्याती आहे. यात्रेच्या दिवशी गावातील सर्व धर्मियांच्या घरी सण साजरा केला जातो व नाल साहेबाला चपाती गूळ तूप हे पदार्थ घालून तयार केलेल्या मलीद्याचा नैवेद्य दाखवला जातो. गुरुवार दिनांक 23 मार्च रोजी रात्री नालसाहेबाचा छबिना निघणार आहे ,यामध्ये सर्व गावकरी सहभागी होत असतात. छबीन्या पुढे बँड ढोल ताशा लेझीम या वाद्यांचा गजर होत असतो व दारू कामाची आतषबाजी केली जाते , पहाटे छबिन्याचे विसर्जन करण्यात येते. यात्रेनिमित्त शुक्रवार दिनांक 24 रोजी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे, यासाठी 21 हजारापासून 5 हजार रु. पर्यंत बक्षीसे दिली जाणार आहेत. शनिवार दिनांक 25 रोजी रात्री ऑर्केस्ट्रा चा भव्य कार्यक्रम सादर होणार आहे. यात्रा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत,यात्रा कमेटी व गावातील तरुण मंडळी प्रयत्नशील आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा