माढ्यातील ग्रामीण रुग्णालयात 4 ते 5 दिवसांत कोव्हिड सेंटर सुरू होणार - जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे
30 बेड ऑक्सीजनसह व इतर 20 बेडची सुविधा उपलब्ध होणार
माढा / प्रतिनिधी - राजेंद्र गुंड AJ 24 Taas
-सध्या माढा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे रुग्णांना त्वरित वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून आमदार बबनदादा शिंदे यांनी जिल्हाधिकारी व सिव्हिल सर्जन यांच्याकडे मागणी केली होती त्यानुसार मंजुरी मिळाली असून तांत्रिक व इतर बाबींची पूर्तता करून 4 ते 5 दिवसांत प्रत्यक्षात डेडीकेटेड कोव्हिड सेंटर माढ्यातील ग्रामीण रुग्णालयात सुरू होणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले.
ते रविवारी 18 एप्रिल रोजी माढा येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करताना बोलत होते.
पुढे रणजितसिंह शिंदे म्हणाले की, माढा शहर व परिसरातील गावांमधील कोरोनाचे रुग्णांची तात्काळ सोय होऊन प्राथमिक उपचार घेता यावा याकरिता सध्या 30 बेड ऑक्सीजनच्या सुविधेसह व इतर 20 बेड उपलब्ध करून दिले जाणार आहेत त्याचबरोबर डिजिटल एक्स रे मशीन,उपयुक्त गोळ्या,औषधे,बेड व गाद्या आणि आवश्यक इतर साहित्य आमदार बबनदादा शिंदे यांच्या फंडातून ताबडतोब दिले जाणार असल्याचे सांगत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना वेळेवर चांगले उपचार देण्याच्या व माढा शहर व परिसरातील कोरोना चाचण्या वाढविण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना केल्या.
याप्रसंगी माढा ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.सदानंद व्हनकळस यांनी या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे सांगितले तसेच 20 बेड व गाद्या उपलब्ध करून देण्याची मागणी केली तेंव्हा जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी प्रत्यक्षात कोव्हीड सेंटर सुरू होताच कूर्डूवाडीच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी याठिकाणी पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ.सदानंद व्हनकळस,माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे, नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते चंद्रशेखर गोटे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्तात्रय अंबुरे,सचिन चवरे,किरण चव्हाण,मदन चवरे, धैर्यशील भांगे,हिम्मत जाधव,राजेंद्र गुंड,श्रीकांत कुलकर्णी यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
- चौकट - माढा तालुका व विधानसभा मतदारसंघातील ज्या नागरिकांना शारीरिक त्रास होत असेल आणि काही प्राथमिक लक्षणे जाणवत असतील त्यांनी दुखणं अंगावर न काढता त्वरित कोरोना चाचणी करून घ्यावी आणि जर चाचणी पॉझिटिव्ह आली तर ताबडतोब वैद्यकीय उपचार घेतल्यास कोरोनाचा आजार बरा होतो त्यामुळे घाबरून जाऊ नये परंतु शासनाच्या कोरोना संदर्भातील आदेशांचे व नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे.पात्र लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होताच त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी केले.
फोटो ओळी - माढा येथील ग्रामीण रुग्णालयात कोव्हिड सेंटर सुरू करण्यापूर्वी पाहणी करताना जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे, झुंजार भांगे,डॉ.सदानंद व्हनकळस व इतर मान्यवर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा