वडूज प्रतिनिधी / शरद कदम
तुपेवाडी (ता. खटाव) येथिल दादासो बाबुराव काळे वय ४० या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने गावातील सर्व ग्रुपवर पत्ररुपी मेसेज टाकल्याने परिसरातील सावकारी गुन्हेगारीचा पर्दाफाश झाला आहे.
या बाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दादासो काळे यांचे कातरखटाव येथे सायकल दूकान आहे. दुकानात ये-जा करण्याने येथिल शिवाजी उत्तम कदम या युवकाची मैत्री झाली. काळे यांची पत्नी आजारी पडल्याने त्यांना ३० हजार रुपयांची गरज भासली. त्यामुळे काळे यांनी कदम या मित्राकडून ३० हजार रुपयांची मागणी केली. त्या मित्राने माझे मेव्हणे आनंदा शंकर बागल यांचेकडून रक्कम घेवून देतो. परंतु काहीतरी डाग आणून दे तरच तुला रक्कम देतो असे सांगितले. त्यानुसार काळे यानी पत्नीची बोरमाळ, कानातील फुले, ठुशी व स्वताची चैन असे चार तोळयाचे दागिने ठेवून त्यांच्याकडून ३० हजार रुपये उचलले होते. एक वर्षानंतर काळे यांनी जवळ असणारे दुसरे दागिने गहाण ठेवून व दुकानात काटकसर करुन तसेच एल आय सी च्या पावतीवर कर्ज घेवुन रक्कम जमा करुन मित्राची सर्व रक्कम परत केली. सर्व रक्कम परत दिल्याने काळे यांनी मित्राजवळ ठेवलेल्या दागिन्यांची मागणी केली. त्यांनी आजपर्यंत ते डाग काळे यांना दिले नाहीत. काळे यांच्या पत्नीने डाग मागणीसाठी फोन केला तेव्हा तिला मित्राकडून आरेतुरे भाषा वापरण्यात आली. पुन्हा काळे यांनी डागाची मागणी केली तेव्हा "तुला काय करायचे ते कर, मी कुणाला भीत नाही" असे उत्तर दिले.
घडलेला सर्व प्रकार काळे यांनी गावातील सर्व ग्रुपवर पत्ररुपी मसेज टाकला व तुपेवाडी परिसरातील इनाममळा येथे पिंपरणीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी पत्रात असेही म्हटले आहे की, "मी माझे बरेवाईट करुन घेत आहे, या सर्व विषयाला दोघे कारणीभुत आहेत, माझ्या परस्पर घरातील लोकांना न्याय मिळावा. त्यांचे मोबाईलवरील बोलणे रेकॉर्ड केले आहे, एवढेच नव्हे तर एक वर्षापुर्वी सायकल दुरुस्त केलेले नऊशे रुपये सुद्धा त्यांनी मला दिले नाहीत. एक महिन्यापासून माझे दुकान बंद आहे. माझी पत्नी व दोन मुले यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मी हतबल झालो आहे. त्यांनी दमदाटी केल्याने मी टोकांचा निर्णय घेतला आहे."
या प्रकरणाने मात्र परिसरातील सावकारी गुन्हेगारीची पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी वडूज पोलिसठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक मालोजीराजे देशमुख करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा