संदीप त्रिंबके यांचे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत यश
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भूतेश्वर विद्यामंदिर अंबवडे ता. खटाव येथील शिक्षक संदीप शंकर त्रिंबके यांच्या नवोपक्रमास राज्यस्तरावर पाचवा क्रमांक मिळाला.आशिष ई मासिक नागपूरचे प्रमुख संपादक आशिष देशपांडे यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे माध्यमिक शिक्षकांसाठी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी संदीप त्रिंबके यांनी गणितातील मूलभूत संबोध स्पष्टीकरणातून प्रगतीकडे वाटचाल हा नवोपक्रम सादर केला होता. महाराष्ट्र राज्यातून एकूण २०० नवोपक्रम प्राप्त झाले होते. त्यातील उत्कृष्ठ पाच नवोपक्रमांची निवड करण्यात आली होती. हा नवोपक्रम इयत्ता ५वी ते १० वी या वर्गांसाठी उपयोगी असून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा गणित विषयाचा पाया मजबूत होणार आहे.
संदीप त्रिंबके यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविध उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सातत्य ठेवून जिल्हा व राज्य स्तरावर आपल्या निबंध लेखनाची व नवोपक्रमाची छाप टाकली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची सतत धडपड असते. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्यात आणि स्वतःही विविध स्पर्धेत सहभाग घेण्यात ते आघाडीवर असतात. सध्या कोरोनाच्या काळात शाळा बंद पण शिक्षण सुरू असताना ऑनलाइन उपक्रमाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या नवोपक्रम स्पर्धेत राज्य स्तरावर सलग तीन वर्ष त्यांची निवड झाली आहे. त्यांनी विज्ञान प्रदर्शनामध्ये सलग २१ वर्ष सहभागी होऊन जिल्हा व राज्य स्तरावर शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली आहे. त्यांच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पुरस्कार देण्यात आले आहेत. पुणे येथील संकेत कला क्रीडा प्रतिष्ठान, माण पत्रकार संघ आदर्श शिक्षक पुरस्कार, अंबवडे ता .खटाव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व ग्रामस्थ यांच्या वतीने स्मृती ग्राम गौरव पुरस्कार, सातारा जिल्हा विज्ञान संघ, सातारा जिल्हा गणित अध्यापक आदि मंडळाच्या वतीने त्यांना गौरवण्यात आले आहे .हा नवोपक्रम यशस्वी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे (खटाव),गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे(माण), केंद्रप्रमुख मोहन साळुंखे, मुख्याध्यापक शशिकांत खैरमोडे यांचे मार्गदर्शन मिळाले तर गणेश पवार, लक्ष्मण जाधव यांचे सहकार्य लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन सुरेंद्रदादा गुदगे, सचिव सुधाकर कुबेर सर्व संचालक, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा