Breaking

बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१

वडूज - पुसेगाव राज्यमार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य


वडूज - पुसेगाव राज्यमार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य 

 वडूज प्रतिनिधी / शरद कदम
                                                                    
     वडूज - पुसेगाव प्रमुख मार्गावरील खातगुण ते पुसेगाव रस्ता दळणवळणासाठी धोकादायक झाला आहे. या प्रमुख मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे.अनेक वेळा राज्य मार्गावर जीवघेणे अपघात झाले आहेत. या मार्गावरून वाहन चालवणे धोक्याचे झाले आहे. हा मार्ग खड्डेमुक्त व्हावा यासाठी अनेकदा वेगवेगळ्या पक्षांच्या वतीने रस्तारोको करत आंदोलने छेडण्यात आले. तथापि प्रशासनाने वेळोवेळी या रस्त्याची केवळ मलपट्टी करून वाहन चालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याने संताप व्यक्त होत आहे.
             पुसेगाव-वडूज राज्यमार्गावरील खातगुण ते पुसेगाव दरम्यान असंख्य लहान मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही महिन्यांपूर्वी रस्ता दुरुस्तीवर लाखोंचा खर्च करून खड्डे बुजवण्यात आले होते. मात्र काही दिवसांतच त्याची आवस्था पहिल्या सारखीच झाल्याने वाहन चालकांमधुन संताप व्यक्त होत आहे. हे खड्डे जीवघेणे बनले आसल्याने परिसरातील वाहन चालक जीव मुठीत धरून वाहन चालवत आहेत.पावसाळ्यात हे  खड्डे पाण्याने भरलेले असल्यामुळे किंवा रात्रीच्या प्रवासा दरम्यान खड्ड्यांचा अंदाज न आल्याने भरधाव वेगातील वाहनांना खोल खड्ड्यात आदळून किंवा खड्डा चुकवण्याच्या नादात छोटे मोठे अपघात होत आहेत. 
            या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी कित्येकदा विविध पक्षांच्या वतीने रस्तारोको करत आंदोलने छेडण्यात आले आहे. या मार्गावरून शेतकर्यांसह, शाळा, कॅालेजचे विद्यार्थी, व्यवसायीक व नोकरवर्गाची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र या राज्यमार्गाची झालेल्या दयनीय अवस्थेमुळे सर्वांनाच जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याने मार्गावरील खड्डे कोणाच्या तरी मृत्युची प्रतीक्षा करत आहे का ? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा