*पन्नास वर्षांनंतर बालदिनी भरला नूतन विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा उत्साही मेळावा*
कुर्डुवाडी येथील नूतन विद्यालयात पन्नास वर्षांपूर्वी असलेल्या विद्यार्थ्यांचा मेळावा विशेष म्हणजे बालदिनी संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर चिंचवडकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास तत्कालीन माजी मुख्याध्यापक व शिक्षक पंचाक्षरी होदाडे,सुरेश गिराम, जयसिंग भांगे,बी.एस.निकम,डी.एस.चव्हाण,सौ.सुनंदा निवाडे, ऊषा काळे,माजी नगराध्यक्ष राजेंद्र पारखे, चंद्रशेखर म्हमाणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
१९७२-७३ साली नूतन विद्यालयात शिकलेल्या व आता सत्तरीकडे झुकलेल्या विद्यार्थ्यांनी "नूतनिष्ट"नावाचा ग्रुप तयार केला होता.दोन वर्षांपासून जुन्या विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्याचे घाटत होते पण कोरोनोने लांबलेला हा कार्यक्रम बालदिनी घेण्यात आला.
दिपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.अरुण कोरे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. सर्व मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.
प्रारंभी नूतनिष्टचे ग्रुपअॅडमीन प्रभाकर गोरे व संजय गोखले यांनी ग्रुपची संकल्पना व शाळेच्या भेटीची ओढ आपल्या भाषणात विषद केली.याच वेळेस माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेस काॅम्पुटर व प्रभाकर गोरे यांचे वतीने शालेय वाचनालयास दोन पुस्तकं संच, आनंद भिवरे यांचें तर्फे १५ खुर्च्या संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर चिंचवडकर व मुख्याध्यापिक लक्ष्मीकांत डंके यांच्याकडे सप्रेम भेट म्हणून सुपूर्द करण्यात आल्या.तर माजी प्राचार्य सौ.शोभा व बाळासाहेब इंगवले-पाटील यांच्या वतीने दहावी विद्यार्थी प्रोत्साहनासाठी एक लाख रुपयांची भेट दिली.
संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर चिंचवडकर यांनी आपल्या भाषणात नूतन विद्यालयाची गुणात्मक प्रगती सांगून सत्तरीतल्या विद्यार्थ्यांनी पन्नास वर्षांनंतरही शाळेविषयी जी आपुलकी अन् प्रेम दाखविले त्याबद्दल गौरवोद्गार काढून आभार मानले.
प्रमुख पाहुणे पंचाक्षरी होदाडे यांनी तत्कालीन विद्यार्थ्यांच्या भेटीचा आनंद आणि विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा दिला. नूतनिष्टचे सौ.शोभा पाटील-इंगवले,अॅड.राजन दिक्षित,ज्येष्ठ पत्रकार अरुण कोरे,सौ.राजन जोशी यांनी शालेय धड्या बरोबरच प्रतिकूल परिस्थितीतही शाळेने दिलेली जीवनमुल्ये आयुष्याच्या वाटचालीत कशी उपयोगी आली याची उदाहरणांसह माहीती विषद केली.
शाळेत पाऊल ठेवताच या ३५ माजी विद्यार्थी- विद्यार्थीनींनी भान हरपून बालदिनाच्या मुहूर्तावर आपलं बालपण सत्तरीतही फोटोसेशनसह ताजतवान व मंत्रमुग्ध केलं.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक लक्ष्मीकांत डंके व त्यांचा स्टाफ,नूतनिष्टचे शितलभाई तंबोळी, विजयकुमार धोका,केशर सोनिमिंडे, आनंद भिवरे,अरुण कोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा