माढेश्वरी अर्बन बँकेची आर्थिक स्थिती मजबूत ; प्रथमच शून्य टक्के एनपीए राखण्यात यश - चेअरमन बबनराव शिंदे
माढा / प्रतिनिधी - बँक चालविणे ही जरी तारेवरची कसरत असली तरी सर्वांच्या सहकार्याने चालू वर्षी माढेश्वरी अर्बन बँकेला 1 कोटी 68 लाख इतका नफा झाला असून बँकेची आर्थिक स्थिती मजबूत असून प्रथमच शून्य टक्के एनपीए राखण्यात यश आल्याचे सांगत सभासदांना 7 टक्के लाभांश देणार असल्याचे चेअरमन आमदार बबनराव शिंदे यांनी जाहीर केले आहे.
ते माढा येथे माढेश्वरी अर्बन डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या 27 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
सुरुवातीला माढेश्वरी देवी व माजी आमदार (कै.) विठ्ठलभाऊ शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रास्ताविकात व्हाईस चेअरमन अशोक लुणावत म्हणाले की, सध्या बँकेचे 10717 सभासद असून 260 कोटी ठेवींचा टप्पा गाठला आहे. बँकेच्या उत्कृष्ट व पारदर्शक कारभारामुळे सतत ऑडिट वर्ग 'अ' मिळाला असून बकेस विविध पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बँक आपली समजून जबाबदारी व प्रामाणिकपणे काम करावे तसेच कर्जदारांनी वेळेवर कर्जाचे हप्ते भरून सहकार्य करावे. बँकेने आर्थिक व्यवहाराबरोबरच आजतागायत 7 हजार जणांच्या यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत.कोविडच्या काळात ज्या विद्यार्थ्यांचे पालक मयत झाले त्यांना शिक्षणासाठी साडेपाच लाख रुपये दिले आहेत.सभासदांनी सोने तारण व पंतप्रधान विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
अहवाल वाचन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे यांनी केले.
सूत्रसंचालन विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी केले.आभार संचालक गणेश काशीद यांनी मानले.
यावेळी सभापती विक्रमसिंह शिंदे, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक पोपट गायकवाड,डॉ.निशिगंधा माळी, हनुमंत पाडूळे,संचालक राहूल कुलकर्णी,गणेश काशीद,संतोष अनभुले,राजेंद्र पाटील,उदय माने,दादा सुरवसे,नागनाथ जवळगे,नानासाहेब शेंडे,अशोक शिंदे,सुनील रावडे, सहाय्यक व्यवस्थापक नंदकुमार दुड्डम,राजकुमार भोळे,निलेश कुलकर्णी,लक्ष्मण शिंदे,संजय गायकवाड,अनिल कदम यांच्यासह सभासद व बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा