टेंभुर्णी येथे ऊस संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यासाठी उद्या रास्ता रोको आंदोलन
संजय कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सर्व संघटना एकवटणार ?
टेंभुर्णी दि.५ (प्रतिनिधी):- सोलापूर जिल्ह्यातील साखर सम्राटांच्या आडमुठ्या धोरणाच्या विरोधात, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांच्या मनमानी व भ्रष्टाचारी कारभारा विरोधात, ऊस वाहतूकदार शेतकरी अण्णा भोसले यांच्या खुनाच्या चौकशीसाठी स्वतंत्र स्पेशल टीम नेमून तो खटला महाराष्ट्रात वर्ग करण्यासाठी, ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांच्या फसवणुकी बाबत कारखानदार व शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशा विविध मागण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता टेंभुर्णी - कुर्डूवाडी रोड बायपास चौक टेंभुर्णी तालुका माढा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे संजय कोकाटे यांनी सांगितले.
रास्ता रोको आंदोलनाचे निवेदन मा. जिल्हाअधिकारी साहेब सोलापूर जिल्हा सोलापूर, मा जिल्हा पोलीस प्रमुख सोलापूर ग्रामीण, मा.उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर जिल्हा सोलापूर यांना दिले आहे.
गेल्या महिनाभरापासून सोलापूर जिल्ह्यातील ऊस संघर्ष समिती शेतकऱ्यांच्या ऊसाला पहिला हप्ता २५०० रुपये व अंतिम दर ३१०० रुपये मिळावा. म्हणून विविध प्रकारची आंदोलने करत आहेत त्याच अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे साखर कारखान्याचे प्रतिनिधी व ऊस संघर्ष समितीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये बैठकही झाली परंतु ठोस असा कुठलाही निर्णय निघाला नाही.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सांगून सुद्धा कायद्याचे पालन करत नाहीत. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व कारखानदार यांच्यामध्ये अर्थपूर्ण वाटाघाटी झाल्यामुळे मा. जिल्हाधिकाऱ्यांनी ओव्हरलोड वाहणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई करायला सांगून सुद्धा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ऐकायला तयार नाहीत.
ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांना मजूर पुरवतो असे सांगून लाखो रुपये त्यांच्याकडून घेतले जातात व कारखाना सुरू व्हायच्या वेळेस मजूर न देता त्यांना मारहाण करणे त्यांच्यावर खोट्या नाट्या केसेस दाखल करणे असे अनेक प्रकार सुरू होत आहेत, आत्ता तर ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांचा खून करण्यापर्यंत मजल गेलेली आहे.
अशा सर्व मागण्यासाठी सर्व ऊस संघर्ष समितीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन पुकारले आहे. यावेळेस काही अप्रिय घडल्यास त्यास ऊस संघर्ष समिती जबाबदार असणार नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर रस्ता रोको आंदोलन दीपक भोसले, शिवाजी पाटील, सचिन पाटील, अतुल खूपसे पाटील, समाधान फाटे, माऊली हळणवर, तानाजी बागल, रामदासजी खराडे या सर्व ऊस संघर्ष समितीतील नेत्यांच्या उपस्थित होणाऱ्या रस्ता रोको आंदोलनास पक्ष, जात, पंथ विसरून फक्त शेतकरी जात म्हणून उपस्थित राहावे असे आवाहन संजय कोकाटे यांनी केले आहे.
चौकट १
ऊस वाहतूकदार शेतकरी अण्णा भोसले याची निर्गुण हत्या करण्यात आली त्यावर अद्याप पर्यंत कुठल्याही साखर कारखानदाराने भ्रशब्द काढलेला नाही त्यांच्या खुनाची तातडीने विशेष पथक नेमून महाराष्ट्रामध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा या मागण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
चौकट २
नुसत्या माढा तालुक्यातून यावर्षी सुमारे १००० ऊस वाहतूक शेतकऱ्यांची सुमारे ५० ते ६० कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे प्रत्येक वर्षी हजारो ऊस वाहतूक शेतकऱ्यांची अशीच फसवणूक केली जाते व त्यातूनच अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यावरही कारखानदार भ्रशब्द काढायला तयार नाहीत. वास्तविक कारखानदार व शासनाकडून नुकसान भरपाई ऊस वाहतूक शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे.
*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा