फेब्रुवारी अखेर व मार्च मध्ये गाळपास येणा-या ऊसासासाठी एफ.आर.पी. पेक्षा जादा अनुदान - आ.बबनराव शिंदे
बेंबळे।प्रतीनीधी।
16 ते 28 फेब्रुवारी साठी प्रति टन रू.75/- व 1 मार्च ते हंगामपर्यंत प्रतिटन रू.150/-प्रमाणे वाढीव अनुदान
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथील सन 2022-23 चा गाळप हंगाम सुरू असून या गळीत हंगामात 16 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत गाळपास येणा-या ऊसासाठी प्रति टन रू.75/- व 1 मार्च ते हंगामपर्यंत गाळपास येणा-या ऊसासाठी प्रतिटन रू.150/-प्रमाणे एफ.आर.पी. पेक्षा वाढीव अनुदान देण्यात येणार असल्याची माहीती संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथील सन 2022-23 चा गाळप हंगाम सुरू असून युनिट नं.1 पिंपळनेर येथे आजअखेर 14 लाख 21 हजार 234 मे.टन व युनिट नं.2 करकंब येथे आजअखेर 4 लाख 34 हजार 787 मे.टन ऊसाचे गाळप झालेले आहे. दोन्ही युनिटचे मिळून आजअखेर 18 लाख 56 हजार 021 मे.टन ऊसाचे गाळप झालेले आहे.
या गळीत हंगामामध्ये ऊस पुरवठादार सभासद व ऊस पुरवठादार यांच्या ऊसाचे नुकसान होवू नये यासाठी दि.16 ते 28 फेब्रुवारी,2023 या कालावधीत गाळपास येणा-या ऊसासाठी एफ.आर.पी. पेक्षा प्रति टन रू.75/- व 1 मार्च ते हंगामपर्यंत गाळपास येणा-या ऊसासाठी प्रतिटन रू.150/-प्रमाणे जादा अनुदान देण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतलेला आहे. या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा जाता अंदाजे एफ.आर.पी. प्रति टन रू.2620/- येत असून दि.16 ते 28 फेब्रुवारी,2023 या कालावधीत गाळपास येणा-या ऊसासाठी एफ.आर.पी. पेक्षा प्रति टन रू.75/-याप्रमाणे एकूण प्रति टन रू.2695/- व 1 मार्च ते हंगामपर्यंत गाळपास येणा-या ऊसासाठी प्रतिटन रू.150/-याप्रमाणे एकूण प्रतिटन रू.2770/-ऊस दर होणार आहे. कारखान्याने दि.31 जानेवारी,2023 अखेर प्रति टन रू.2350/- प्रमाणे पहिला ॲडव्हान्स ऊस पुरवठादार शेतक-यांना अदा केलेला आहे अशी माहीती आ.शिंदे यांनी दिली.
तरी सर्व सभासद,ऊस पुरवठादार शेतक-यांनी त्यांचा ऊस विठ्ठलराव शिंदे कारखान्यास गाळपास देवून सहकार्य करावे असे आवाहन संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी केले. सदरप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे व इतर अधिकार उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा