विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा दुसरा हप्ता 100 रूपये बँक खात्यात जमा -आ.बबनराव शिंदे
बेंबळे.. प्रतिनिधी.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब या कारखान्याकडे ऊस गाळप हंगाम 2023-24 मध्ये गाळपास आलेल्या ऊसास प्रति टन 100 रूपये प्रमाणे दूसरा ॲडव्हान्स हप्ता शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करणेत आला असल्याची माहीती संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने सन 2023-24 गळीत हंगामामध्ये युनिट नं.1 कडे 18 लाख 92 हजार 949 मे.टन ऊसाचे गाळप होवून 11 टक्के साखर उता-याने 19 लाख 28 हजार 850 क्विंटल साखर पोती उत्पादीत झाली आहेत. तसेच युनिट नं.2 कडे 6 लाख 25 हजार 888 मे.टन ऊसाचे गाळप होवून 11.14 टक्के साखर उता-याने 6 लाख 63 हजार 900 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले आहे. दोन्ही युनिट चे मिळून 25 लाख 18 हजार 837 मे.टन गाळप होवून 25 लाख 92 हजार 750 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झाले आहे.
या हंगामात दोन्ही युनिट कडे गाळपास आलेल्या ऊसास हंगामाचे सुरूवातीपासून 10 दिवसाला ऊस बिलाचे पेमेंट केलेले आहे. या हंगामाचे सुरूवातीपासून 15 जानेवारी, 2024 पर्यत गळीतास आलेल्या ऊसास पहिला ॲडव्हान्स प्रती टन 2700/- रूपये प्रमाणे अदा करण्यात आला आहे. तसेच दि.16 ते 31 जानेवारी, 2024 या कालावधीत गळीतास आलेल्या ऊसास पहिला ॲडव्हान्स प्रती टन 2750/- रूपये, दि.1 ते 29 फेब्रुवारी,2024 मध्ये 2800/- रूपये प्रति टन व 1 मार्च,2024 पासून हंगाम अखेर पर्यंत गाळपास आलेल्या ऊसास प्रती टन 2850/- रूपये प्रमाणे पहीला ॲडव्हान्स अदा करणेत आलेला आहे. सध्या सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांना ऊस पिक मशागतीसाठी पैशाची आवश्यकता असल्याने प्रती टन 100/-प्रमाणे दूसरा ॲडव्हान्स हप्ता देणेचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यानुसार प्रती टन 100/- रूपये प्रमाणे दूसरा ॲडव्हान्स हप्ता बँकेत जमा करणेत आलेला आहे. या ऊस बिलापोटी कारखान्याने 14 कोटी 3 लाख रूपये बँकेत जमा करणेत आलेले आहेत.
सभासद व ऊस पुरवठादार शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, मुकादम, व्यापारी, मटेरियल पुरवठादार व इतर यांचेमध्ये विठ्ठलराव शिंदे कारखान्याविषयी विश्वासअर्हता असल्याने पुढील सन 2024-25 गळीत हंगामासाठी दोन्ही युनिटकडे शेतक-यांचे ऊस नोंदी देणेचे व वाहनमालक, मुकादम यांचे करार करणेची संख्या दिवसेनदिवस वाढत आहेत. आवश्यकतेनुसार यंत्रणेचे करार लवकरच पुर्ण होत असून ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार व मुकादम यांनी कारखान्याचे शेती विभागाशी संपर्क करून करार करावेत. तसेच ऊस तोडणी करीता करार केलेले ट्रॅक,ट्रॅक्टर, ट्रॅक्टरगाडी, बैलगाडी यांचे करारानुसार तोडणी वाहतूक ॲडव्हान्स बँकेत वर्ग केले आहेत. तसेच कारखाना धोरणानुसार सवलतीच्या दरात लवकरच साखर वाटप करणेत येईल अशी माहीती संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
सदरप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे,कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा