Breaking

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०

सोलापूरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी सिंघम सुहास भोसले यांची नियुक्ती...*AJ 24 Taas News Maharashtra


सोलापूरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी सिंघम सुहास भोसले यांची नियुक्ती...

*AJ 24 Taas News Maharashtra
बेंबळे प्रतिनिधी/ सचिन शिंदे

बेंबळे दि.  02  - महाराष्ट्र पोलीस खात्यातील तब्बल १५० वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये ४३आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने तसा आदेश जारी केला असून सर्व अधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये सध्या अमरावती येथे कार्यरत असणारे सुहास भोसले यांची नियुक्ती सोलापूरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी झाली आहे.



सोलापूरचे नवे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बेंबळे गावचे आहेत. बी. एस्सी., एल. एल. बी. व एम. बी. ए. आदी शैक्षणिक पदव्या पुणे विद्यापिठातून प्राप्त केलेल्या भोसले यांनी १९८८ मध्ये महाराष्ट्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेमधून पोलीस निरीक्षक या पदावर कारकीर्दीस सुरुवात केली. १९९६ साली भोसले यांची निरीक्षकपदी बढती झाली.
आजवर भोसले यांनी सोलापूर शहर फौजदार चावडी, जेल रोड पोलीस चौकी, तर ग्रामिणमध्ये अक्कलकोट, करमाळा, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा या ठीकाणी सेवा बजावली आहे. भोसले हे मंगळवेढा, माळशिरस व अक्कलकोट येथे सेवा बजावताना गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरले होते. विशेष म्हणजे अक्कलकोट येथे दोन दिवस चालणारी गणपती मिरवणूकीची प्रथा त्यांनी मोडून काढली. 

भोसले अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी अशी आजवरची त्यांची कारकीर्द राहिली आहे. शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेल्या भोसलेंनी शिस्तीची सुरूवात स्वतःपासून केली. आपल्याच खात्याला शिस्त लावण्याच्या प्रयत्नात त्यांनी आजवर असलेल्या कर्मचार्‍यांच्या पारंपारिक सवयी आणि मनमानीच्या पार चिंढड्या काढल्या. भोसले यांनी सेवेदरम्यान अमरावतीकरांना देखील शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, या शिस्तीतून कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना देखील सुटका दिलेली नव्हती.

सुहास भोसले यांनी अमरावतीमध्ये आदर्शवत कामगिरी केली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त पदाच्या काळात त्यांनी गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी विशेष मोहीम सुरू केली होती. गुन्हेगारांना पकडण्यासाठी कोम्बिंग आॅपरेशन, महिलांच्या सुरक्षिततेसाठी एफआयआर अ‍ॅप, प्रतिसाद अ‍ॅप व दामिनी पथक तैनात करणे याला त्यांनी प्राधान्य दिले होते. तक्रारींचे निवारण तात्काळ करता यावे यासाठी त्यांनी सोशल मीडिया विशेषत: व्हॉटस् अ‍ॅपच्या वापरावर भर देण्याच्या सूचना केल्या होत्या आणि सहकाऱ्यांनी देखील त्याचा प्रभावी वापर करून अवैध धंदे चालकांच्या नांग्या ठेचल्या.

खेळाची प्रचंड आवड असलेल्या भोसले यांनी शालेय स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर थ्रो बॉल, व्हॉली बॉल व कबड्डी  खेळात पदकासह बहुमान पटकावला होता. भोसले यांनी सहाय्य आयुक्तपदी सेवा बजावताना लोकसंवाद वाढवण्यासाठी विशेष मोहीमा यशस्वीपणे राबवून सामान्य माणसाला पोलीस हे मित्र वाटायला हवे त्यांच्यामध्ये सुसंवाद असावा हा यासाठी ते नेहमी आग्रही राहिले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा