*नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते भूमिपूजन*
लातूर/उदगीर, दि.10:-
उदगीर नगर परिषदेच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून नगरपरिषदे अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही याची ग्वाही पर्यावरण, संसदीय कार्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन व रोजगार हमी योजना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
आज नगर परिषद उदगीर अंतर्गत शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून उदगीर शहरामधील विकास कामाचे उद्घाटन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उदगीर नगर परिषद चे अध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगर परिषद मुख्याधिकारी भारत राठोड, बांधकाम सभापती मंजूरखां पठाण, जि.प.सदस्य ज्ञानेश्वर पाटील, माजी आमदार गोविंद केंद्रे,चंदन पाटील, शेख समीर, चंद्रकांत वैजापुरे, भरत चामले, नगर परिषद सदस्य सचिन हुडे नामदेव भोसले . व अन्य मान्यवर उपस्थित होते.
या उदघाटनप्रसंगी राज्यमंत्री बनसोडे यांनी संतोषीमाता नगरकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी रेल्वे गेटवरून उड्डाणपूल, उमा चौक ते शिवाजी चौक व शिवाजी चौक ते आप्पाराव चौकापर्यंत उड्डाणपूल तसेच उदगीर ते बिदर पर्यंतचा राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरच सुरु करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे व आस्टा मोड ते उदगीर पर्यंतचा रोड एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
समता नगर येथील सार्वजनिक स्मशान भूमीचा मार्ग लवकरच मार्गी लावण्यात येईल आणि उदगीर शहरामधील नाट्यगृह, बौद्धविहार, लिंगायत भवन व शादीखाना बांधकाम करण्याच्या कामास तात्काळ सुरु करून लोकांच्या सेवेमध्ये आणणार असल्याचे व उदगीरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे राज्यमंत्री बनसोडे यांनी आश्वस्त केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, दलित वस्ती सुधार योजना, नागरी दलितेत्तर योजना व महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथान महाअभियान (जिल्हास्तर) अंतर्गत उदगीर शहरामधील उदय नगर, उमा चौक, हनुमान रोड व समता नगर येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नालीचे बांधकाम करणे या कामासाठी एकूण 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा