माढा / प्रतिनिधी- राजेंद्र गुंड
- माढा तालुक्यातील कापसेवाडी-हटकरवाडी येथील श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयात 26 नोव्हेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पालक प्रतिनिधी तुकाराम पालेकर व मुख्याध्यापक औदुंबर चव्हाण यांच्या हस्ते करुन संविधान दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी 26/11 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व विचारातून आजच्या पिढीने आदर्श घेतला पाहिजे तसेच ज्याप्रमाणे डॉ.आंबेडकरांना दररोज पुस्तके वाचण्याची मोठी आवड होती त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी सुद्धा क्रमिक पुस्तके व इतर दर्जेदार पुस्तकांचे वाचन नियमितपणे करून आपले ज्ञान व माहिती वृद्धिंगत करण्याचे आवाहन केले तसेच देशासाठी लढत असताना शहिद झालेल्या जवानांच्या त्यागातून व कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन याप्रसंगी मार्गदर्शन करताना शिक्षकांनी केले.
सध्या भयंकर कोरोना विषाणूच्या संसर्गाचे संकट सर्वत्र आहे त्यामुळे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी तोंडावर मास्क वापरावा,सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे तसेच सँनीटायझरचा वापर करून वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुण्याचे आणि नियमितपणे व्यायाम व अभ्यास करण्याचे आवाहन मुख्याध्यापक औदुंबर चव्हाण यांनी केले.
याप्रसंगी सहशिक्षक तुकाराम कापसे,प्रविणकुमार लटके,तनुजा तांबोळी,अनिल सदगर,सचिन क्षीरसागर,शिवाजी भोगे,सुनील खोत, सुधीर टोणगे,लहू गवळी,सागर राजगुरू यांच्यासह प्रशालेतील नववी व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन करून आभार सचिन क्षीरसागर यांनी मानले.
फोटो ओळी -कापसेवाडी-हटकरवाडी ता.माढा येथे संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करताना तुकाराम पालेकर, मुख्याध्यापक औदुंबर चव्हाण व इतर मान्यवर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा