दिव्यांग निधी प्रकरणात किनवट च्या गटविकास अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकांवर कार्यवाहीची टांगती तलवार
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
दिव्यांग निधी प्रकरणात जिल्हा प्रशासनाने किनवटच्या गट विकास अधिकाऱ्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत यातील दोषींवर काय कार्यवाही केली अशी विचारणा करत दि 31 डिसेंबर 2020 पर्यंत स्वयंस्पष्ट अभिप्रायासह चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने दोषी सरपंच ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहे
शासन निर्णयानुसार तीन टक्के व पाच टक्के दिव्यांग निधी किनवट तालुक्यातील 134 ग्रामपंचायतींनी वेळोवेळी खर्च न केल्याचे नमूद करून तो निधी तात्काळ खर्च करावा अशी मागणी राज माहुरकर सचिव दिव्यांग कामगार संघटना किनवट तालुका यांनी अनेक वेळा रीतसर लेखी पत्र देऊन मागणी केल्यानंतरही संवेदनाहीन किनवट पंचायत समितीचे प्रशासन असहाय्य हतबल दिव्यांग बांधवांच्या न्याय मागणीकडे दुर्लक्ष करीत सर्व निवेदनाला केराची टोपली दाखवली परिणामी दिव्यांग कामगार संघटना किनवट तालुका सचिव राज माहुरकर यांनी सदर प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आणि किनवट च्या गटविकास अधिकाऱ्यांसह नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड जिल्हाधिकारी व महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले
त्यामुळे जिल्हा व तालुका प्रशासनात खळबळ माजली असून नांदेड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधीर ठोंबरे यांनी पत्र क्र जीपना/ग्राप5/3139 दि 21 डिसेंबर 2020 च्या पत्रात किनवटचे गटविकास अधिकारी सुभाष धनवे यांनी दिव्यांग निधी प्रकरणात दाखविलेली उदासीनता व कर्तव्यात कसूर केल्यामुळेच सदर प्रकरण न्यायालयात पोहोचल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे तसेच सन 2016-17 ते 2020-21 पर्यंत 134 ग्रामपंचायतींचा विकास आराखडा तपासुन अंदाजपत्रकीय तरतूद ,वार्षिक खर्च बाब निहाय अहवाल, वैयक्तिक / सार्वजनिक खर्चाचे प्रमाणके, कॅश बुक व केलेल्या कामाचे मोजमाप पुस्तिकेतील नोंदी इत्यादी बाबी तपासून आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह 134 ग्रामपंचायतींचा अहवाल दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंत तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले
चौकशीअंती शासन निर्णयानुसार दिव्यांग निधी खर्च न करणाऱ्या किनवट तालुक्यातील 134 ग्रामपंचायतीमधील सरपंच ग्रामसेवकांसह गटविकास अधिकाऱ्यावर कार्यवाही होणार का याकडे तमाम लोकांचे लक्ष लागून आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा