लोहगाव विमान तळाचे नाव "जगद्गुरु संत तुकाराम महाराज विमानतळ" असे करावे.-
अखिल भारतीय वारकरी मंडळाची मागणी .
माळशिरस [प्रतिनिधी] - लोहगाव विमानतळाचे नाव "जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज विमानतळ "असे करण्याची मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने लोहगाव येथे करण्यात आली आहे. अखिल भारतीय वारकरी मंडळ पुणे विभागीय कमिटीचा ( पश्चिम महाराष्ट्र ) पद नियुक्तीपत्र प्रदान सोहळा मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह .भ .प .प्रकाश महाराज बोधले डिकसळकर(राष्ट्रीय किर्तनकार) यांच्या अध्यक्षतेखाली भव्यतेने संपन्न झाला. त्यावेळी ही मागणी करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर पुणे शहर भाजपचे अध्यक्ष आमदार जगदीश मुळीक, मा. आमदार बापूसाहेब पठारे, वारकरी मंडळाचे केंद्रीय कमिटी सदस्य शंकर महाराज शेवाळे, प्रदेशाध्यक्ष अनिल महाराज वाळके, विभागीय अध्यक्ष दत्तात्रय महाराज सोळसकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सद्गुरु माऊलीनाथ महाराज वाळुंजकर व प.पू.सुमंतबापू हंबीर यांच्यासह मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन झाले. लोहगाव हे श्री संत तुकाराम महाराजांचे आजोळगाव त्यामुळे त्यांचा बालपणाचा बराचसा काळ याच गावात गेला असून त्या काळात या गावी छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनासाठी येत असत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप बोत्रे यांनी तर आभार आदित्य खांदवे यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमानंतर त्याच ठिकाणी अखिल भारतीय वारकरी मंडळाची विभागीय पातळीवरील पहिली सभा संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. श्री प्रकाश महाराज बोधले डिकसळकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यामध्ये विविध कमिट्यांची माहिती त्या त्या कमिटीचे कार्य आणि स्वरूप या विषयी राष्ट्रीय अध्यक्षांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी काही शंकांचे निरसनही करण्यात आले. पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा