Breaking

सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१

जगाच्या पाठीवरील प्रगत विज्ञान म्हणजेच आपली भारतीय संस्कृती : ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज



*जगाच्या पाठीवरील प्रगत विज्ञान म्हणजेच आपली भारतीय संस्कृती : ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज*


 माळशिरस प्रतिनिधी  :भाग्यवंत ल. नायकुडे - "जगाच्या पाठीवर प्रगत विज्ञान म्हणजेच आपली भारतीय संस्कृती" असे गौरवोद्गार अखिलf भारतीय वारकरी मंळाचे राष्ट्रीय अध्यक्ष  ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज डिकसळकर  यांनी श्री सोमेश्वर मंदिर करंजे (ता. बारामती) येथे 'वारकरी संत परंपरा आणि भारतीय संस्कृती' यावर समाज प्रबोधन करताना व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय कमिटीचे अधिवेशन प्रमुख ह भ प शंकर महाराज शेवाळे, प्रदेशाध्यक्ष ह भ प अनिल महाराज वाळके, संत वाडमय प्रचार प्रसाद कमिटीचे प्रदेश प्रमुख ह भ प आनंद महाराज तांबे, पुणे जिल्हाध्यक्ष ह भ प सुखदेव महाराज राज ठाकर,विभागीय अध्यक्ष ह भ प दत्तात्रय महाराज सोळसकर, पुणे विभाग कोषाध्यक्ष ह भ प भानुदास गुजर महाराज आणि खास नेपाळहून आलेले ह भ प गणेश महाराज आवजी (संस्थापक अध्यक्ष संतविचार प्रबोधिनी) , नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष ह.भ.प.मोहन मुरलीधर भांडवलकर  आदि मान्यवर उपस्थित होते.
 अखिल भारतीय वारकरी मंडळ तालूका बारामती जिल्हा पुणेचे  पदनियुक्त पत्राचे वितरण आणि पदग्रहण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून पुढे बोलताना प्रकाशजी बोधले महाराज म्हणाले की, आपले योगशास्त्र म्हणजे विज्ञानच होय आपली संत परंपरा विज्ञानवादी, वास्तव आहे. सत्यवान - सावित्रीची नुसती कथा सांगून चालणार नाही तर त्याला वैज्ञानिक जोड दिली पाहिजे. विरोधकांचे विचार परिवर्तन करण्याचे कार्य आपण सर्वांनी केले पाहिजे. समाजात काम करताना वाईटापेक्षा चांगलेपणावर बोलले गेले तरच कार्य वाढीस लागते. म्हणूनच संतांच्या विचारांची परंपरा जनमाणसांमध्ये रुजवली पाहिजे. नुसते नावे ठेवून समाज सुधारणार नाही तर त्यासाठी पर्यायही दिला पाहिजे तरच लोकांची सुधारणा होते असे प्रतिपादन करून नेपाळ देशाने हिंदू राष्ट्र म्हणून काम केलेले आहे आणि आज मला दिवाळी सणाला बहिण माहेरी आल्यावर जसा आनंद होतो तसा आनंद आज मला गणेश आवजी महाराज नेपाळहून खास या कार्यक्रमासाठी या व्यासपीठावर आलेले आहेत म्हणून होतय. ते खास आलेत म्हणून त्यांना कोटी-कोटी धन्यवाद असे भावस्पर्शी उद्गार आवजी महाराजांबद्दल व्यक्त करून आनंद व्यक्त केला. केवळ टीका केल्याने आपली बुद्धी ची उंची समोरच्याला कळते म्हणून कोणावरही टीका करायची नाही असा सल्ला ही दिला. बोलण्यातून विचारांची उंची आणि कृतीतून कामाची उंची कळते असे मत व्यक्त करून ते पुढे म्हणाले की सर्वांनी मिळून समाजाची सेवा केली पाहिजे . समाजाला समृद्ध आणि सुसंस्कृत केले पाहिजे . हे आपले वारकरी सांप्रदायाचे काम आहे. आपण वेळ आणि विचार दिले तर क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही . संतांचे विचार समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचले जातील म्हणूनच परिवर्तनासाठी कार्य करण्याची गरज आहे. विकासाच्या योजनांचा अभ्यास राजकारणी लोक करतात त्यांच्या अभ्यासाचा आपण समाजपरिवर्तनासाठी उपयोग करून घेतला पाहिजे असेही बोधले महाराजांनी शेवटी सांगितले.
 या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज यांच्या शुभहस्ते श्री सोमेश्वर देवस्थान करंजेचे पुजारी ह.भ.प. मोहन मुरलीधर भांडवलकर यांना अखिल भारतीय वारकरी मंडळाचे  बारामती  तालुका अध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र  प्रदान करून सत्कार करण्यात आला. तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला.
 या सोहळ्यासाठी निमंत्रित केलेले माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे (माजी प्रदेश महासचिव महाराष्ट्र राज्य श्रमिक संपादक व पत्रकार संघ पुणे ) यांचा बोधलेजी महाराज यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला .
भव्य दिव्य स्वरुपात आयोजित केलेल्या धार्मिक सोहळ्याचे सुंदर सूत्रसंचालन आणि  प्रस्तावना ह.भ.प. फरांडे महाराज यांनी केली. प्रारंभी देवस्थानच्या वेशीतून परंपरागत दिंडी स्वरूपात ह. भ. प. प्रकाश महाराज बोधले यांचे औक्षण करून व्यासपीठापर्यंत टाळ मृदुंगाच्या निनादात मिरवणुकीने आणण्यात आले. देवस्थानच्यावतीने मोहन (तात्या) भांडवलकर यांच्या हस्ते त्याचे स्वागत व सत्कार सोहळा संपन्न झाला. प्रारंभी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले.शेवटी पसायदानानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली .या कार्यक्रमासाठी देवस्थाचे पुजारी आणि चेअरमन विनोद भांडवलकर आणि सहकारी यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा