Breaking

सोमवार, १५ मार्च, २०२१

विठ्ठलवाडीच्या श्री विठ्ठल सार्वजनिक वाचनालयास 70 हजारांची पुस्तके सुपुर्दविधानपरिषदेचे आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांच्या स्थानिक फंडातून


विठ्ठलवाडीच्या श्री विठ्ठल सार्वजनिक वाचनालयास 70 हजारांची पुस्तके सुपुर्द
विधानपरिषदेचे आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांच्या स्थानिक फंडातून

माढा / प्रतिनिधी - माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील शासनमान्य 'ब' वर्गातील श्री विठ्ठल सार्वजनिक वाचनालयास विधानपरिषदेचे आमदार वजाहत मिर्झा यांच्या स्थानिक फंडातून 70 हजार रुपयांची पुस्तके माढा तालुका ग्रंथालय संघाचे सचिव ग्रंथमित्र कांतीलाल साळुंखे यांच्या हस्ते वाचनालयाचे सचिव नेताजी उबाळे व वाचनालयाचे माजी अध्यक्ष तथा आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड  यांच्याकडे सुपुर्त करण्यात आली. 

सध्याच्या युवा पिढीतील लोप पावत चाललेली वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये कथा,कादंबऱ्यासह दर्जेदार साहित्य व विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तके वाचण्याची आवड व गोडी निर्माण होण्याच्या उद्देशाने ही पुस्तके देण्यात आली आहेत.या मिळालेल्या 309 पुस्तकांपैकी काही पुस्तके महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहेत तसेच यामध्ये कृषी, बालसाहित्य,महिलाविषयक आणि शासनमान्य विविध कार्यालयात उपयोगी पडणारी पुस्तके असल्याने याचा उपयोग निश्चितच होणार आहे. यापूर्वीही माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रयत्नातून व सहकार्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 3 लाखांची स्पर्धा परीक्षांची व इतर पुस्तके मिळाली होती त्यामुळे स्पर्धा परीक्षा पुस्तकांची संख्या वाढून तो विभाग सक्षम झाला असून या पुस्तकांचा लाभ सभासद व वाचक आणि विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन वाचनालयाचे माजी अध्यक्ष तथा आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड सर यांनी केले आहे. 

ही पुस्तके मिळाल्याबद्दल आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांचे आभार वाचनालयाचे विद्यमान अध्यक्ष तथा नूतन ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र भांगे,सचिव नेताजी उबाळे, संस्थापक-चेअरमन अनिलकुमार अनभुले,वाचनालयाचे उपाध्यक्ष तथा माजी सरपंच बालाजी गव्हाणे, संचालक तथा उपशाखाप्रमुख मोहन कदम,वाचनालयाचे माजी अध्यक्ष राजेंद्र गुंड,खजिनदार शुभांगी रमेश जाधव,धनाजी सस्ते,नेताजी कदम, समाधान कोकाटे,ब्रम्हदेव शिंगाडे, ग्रंथपाल अमोल जाधव,लिपिक रणजित शेंडगे,शिवाजी खरात, सौदागर गव्हाणे,सतीश गुंड,दयानंद शेंडगे,कैलास सस्ते,भिवाजी जाधव, सौदागर खरात,गणेश दळवी यांच्यासह ग्रामस्थ व सभासदांनी मानले.

फोटो ओळी -विठ्ठलवाडी ता.माढा येथील वाचनालयाचे सचिव नेताजी उबाळे यांच्याकडे पुस्तके सुपूर्त करताना ग्रंथमित्र कांतीलाल साळुंखे बाजूला राजेंद्र गुंड सर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा