शासनाच्या आरोग्य विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे - डॉ.विद्या तोडेकर
श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर
माढा / प्रतिनिधी - शासनाचा आरोग्य विभाग व जिल्हा शल्य चिकित्सक सोलापूर यांच्याकडून दरवर्षी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करताना हृदयरोग, हर्निया,कर्णदोष,नेत्रदोष,दुभंगलेले ओठ व टाळू,मतिमंदत्व, गतिमंदत्वासह इतर आजारांच्या मुलांना पुढील कार्यवाहीसाठी रेफर केले जाते तेंव्हा अशा मुलांच्या पालकांनी व मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य तो सल्ला द्यावा म्हणजे शासनाच्या आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन माढा येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या तोडेकर यांनी केले आहे.
त्या कापसेवाडी-हटकरवाडी ता.माढा येथील श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी बोलत होत्या.
प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक औदुंबर चव्हाण यांनी केले.
पुढे मार्गदर्शन करताना डॉ.तोडेकर म्हणाल्या की,सध्या कोरोनाचा संसर्ग व फैलाव ग्रामीण भागात वाढू लागला आहे त्यामुळे मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आणि पालकांनी कोरोना संदर्भात शासनाने दिलेल्या आदेशाचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.आरोग्य संपत्ती हीच खरी सर्वश्रेष्ठ संपत्ती असल्याने पुरेसा व्यायाम आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे तसेच विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करून आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी सतत प्रयत्नशील रहावे.शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांचे दररोज तापमान व ऑक्सिजन लेवल मोजणे आवश्यक असल्याचे सांगून काही अडचण असल्यास नजिकच्या आरोग्य केंद्राकडे संपर्क करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी मुख्याध्यापक औदुंबर चव्हाण,आरोग्य सेविका रेणुका आतकरे,तुकाराम कापसे,प्रवीण लटके,तनुजा तांबोळी, सुधीर टोणगे, सुनील खोत,शिवाजी भोगे,सचिन क्षीरसागर,लहू गवळी,सागर राजगुरू, साईनाथ शिरगिरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा