कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करा - समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव
आरोग्य केंद्रातील टेस्टिंगचे प्रमाण वाढवा,लसीकरणाला गती देण्याच्या सूचना
माढा / प्रतिनिधी - राजेंद्र गुंड
- सध्या काही नागरिक बेफिकीर वृत्तीने व शासनाच्या कोरोनाविषयक नियमांचे पालन न करता बिनधास्तपणे सर्वत्र वावरत आहेत त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग व फैलाव शहरी व ग्रामीण भागात वेगाने वाढू लागला आहे ही परिस्थिती खूपच गंभीर असून लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी सर्व नागरिक व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या कोरोना संदर्भातील आदेशांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे तसेच आरोग्य केंद्रातील टेस्टिंगचे प्रमाण वाढवा आणि लसीकरणाला गती देण्याच्या सूचना सोलापूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव यांनी केल्या.
ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक व लऊळ या ठिकाणच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते.
पुढे बोलताना समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव म्हणाले की,शासनाचे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत परंतु याकरिता जनतेच्या सहकार्याची गरज आहे त्यामुळे नागरिकांनी विनाकारण कोठेही गर्दी करु नये,तोंडाला मास्क वापरावा, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे,हात साबणाने स्वच्छ धुवावेत,वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी कुर्डूवाडी पंचायत समितीचे गटविकासाधिकारी डॉ.संताजी पाटील म्हणाले की, सध्या शासनाच्या वतीने विविध ठिकाणच्या आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू असून त्याचा पात्र लोकांनी लाभ घ्यावा.माझे गाव कोरोनामुक्त गाव या मोहिमेत सक्रीय सहभागी व्हावे.कोरोनाचा संसर्ग रोखणे ही फक्त शासनाची जबाबदारी नसून ती सर्वांचीच सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगून कोरोना रुग्ण संख्या,लसीकरणाच्या आकडेवारीची माहिती घेतली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी,सरपंच, उपसरपंच,ग्रामसेवक,तलाठी,पोलीस पाटील,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका आशा वर्कर,अंगणवाडी सेविका व मदतनीस,शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळी-उपळाई बुद्रुक ता.माढा येथे व्यावसायिकांना सूचना देताना समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव,गटविकासाधिकारी डॉ.संताजी पाटील व इतर मान्यवर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा