Breaking

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

उन्हाळी पावसाने, गारासह वडूज परिसराला झोडपले*सि. कुरोली, सातेवाडी, वाकेश्वर, भुरकवडी येथे ही पाऊसाचे आगमन


*उन्हाळी पावसाने, गारासह वडूज परिसराला झोडपले*

सि. कुरोली, सातेवाडी, वाकेश्वर, भुरकवडी येथे ही पाऊसाचे आगमन 
वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

         उन्हाळ्याच्या प्रारंभानंतर वडूज परिसरात बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह गाराच्या पावसाने झोडपुन काढले. तासभर जोरदार गारासह पाऊस झाल्याने वडूजमध्ये व वडूज परिसरातील सि.कुरोली, सातेवाडी, वाकेश्वर, भुरकवडी व इतर भागामध्येही पावसाने हजेरी लावली. उन्हाच्या काहिलीत झालेल्या या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला असून उन्हाळी ऊस, भूईमूग जनावाराचा हिरवा चारा व इतर उन्हाळी पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे.
        वडूज शहर व परिसरात गेली चार दिवस वातावरणात बदल होत असून दुपारपर्यंत कडक ऊन आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण असे अनुभवायला मिळत आहे. बुधवारी दुपारी अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन गारा व वाऱ्यासह पावसास जोरदार सुरुवात झाली. पावसाचा जोर जास्त असल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले. शहराच्या व गावाच्या काही भागात पाणी साचुन राहीले. 
        तालुक्यात गेल्या काही दिवसापासुन प्रचंड उष्मा वाढला असून उन्हाच्या तीव्रतेमुळे अंगाची लाही लाही होत होती. नागरिक उकाड्याने हैराण झाले असतानाच पावसाने गारासह हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली. या दमदार पावसामुळे हवेत थोडासा गारवा निर्माण झाला असून बळीराजासाठी उन्हाळी पिकांना हा पाऊस फायदेशीर ठरणार असला तरी सध्याच्या काढणीसाठी आलेल्या कांदा पिकाला धोकादायक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा