बेरोजगारीवर मात करण्यासाठी निवडला सीताफळाच्या नर्सरीचा पर्याय
गोरमाळे येथील पदवीधर युवक प्रमोद बनसोडे यांची यशोगाथा
माढा / प्रतिनिधी - मागील काही वर्षांपासून शासकीय नोकरभरती सुरू नाही.अशातच कोरोनाच्या भयंकर संकटामुळे अनेकांना नोक-या गमवाव्या लागल्या आहेत.काही जण योग्य ती शैक्षणिक अर्हता प्राप्त करूनही अनेक वर्षांपासून बेरोजगार आहेत.अशा बिकट परिस्थितीत नवीन व्यवसायाचा श्रीगणेशा व बेरोजगारीवर मात करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित पदवीधर आणि नोकरी गमावलेल्या युवकांनी सीताफळाच्या नर्सरीचा पर्याय निवडला असून या माध्यमातून प्रपंचासाठी हुकमी उत्पन्नाचा स्रोत निर्माण केला आहे.अशीच प्रेरणादायी यशोगाथा बार्शी तालुक्यातील गोरमाळे येथील युवक प्रमोद बनसोडे यांची आहे.
"गरज ही शोधाची जननी आहे" या उक्तीप्रमाणे गोरमाळे येथील युवक प्रमोद बनसोडे यांनी एम ए बी एड शिक्षण पूर्ण केले परंतु शासनाच्या धोरणामुळे त्यांना अपेक्षित नोकरी मिळाली नाही त्यामुळे सुरवातीला काही काळ त्यांच्या पदरी नैराश्य आले परंतु न खचता त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील विविध रोपवाटिका पाहिल्या आणि "इच्छा असेल तर नक्कीच मार्ग दिसतो" या उक्तीप्रमाणे त्यांनी आपल्या शेतात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तम व दर्जेदार जातीच्या सीताफळाची नर्सरी सुरू केली.सुरुवातीला काही काळ गुंतवणूक करुनही त्यांना स्पर्धेच्या युगात बाजारपेठेत आपल्या रोपांची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यांनी विकलेल्या सीताफळाच्या रोपांचा रिझल्ट विविध ठिकाणच्या शेतकरी वर्गांतून अतिशय चांगला येऊ लागला.त्यांच्या नर्सरीमध्ये तयार झालेली रोपे उच्च दर्जाची व गुणवत्तापूर्ण असल्याने उत्पादित माल अतिशय दर्जेदार तयार होवू लागला आणि व्यापारी व ग्राहक यांच्याकडून मोठी पसंती मिळू लागली. सध्या कमी क्षेत्रात व कमी कष्टात मोठ्या प्रमाणात चांगल्या जातीची सीताफळाची हजारों रोपे त्यांच्या नर्सरीमध्ये तयार होत आहेत त्यामुळे विक्रीतून मोठ्या प्रमाणात अर्थाजन होत आहेत त्यामुळे बेरोजगारीवर त्यांनी यशस्वीपणे मात केली आहे. हाच आदर्श इतर युवकांनी घेतल्यास शासकीय नोकरी मिळाली नाही म्हणून निराश न होता विविध जातीची रोपे तयार केली तर उत्तम संधी उपलब्ध होऊ शकते.
- चौकट - कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या खाजगी क्षेत्रातील नोकरीवर गदा आली आणि नवीन नोकरीची संधी कमीच आहे त्यामुळे अनेक सुशिक्षित युवक हताश व निराश झाले आहेत. बेरोजगारांनी एक चांगली संधी म्हणून विविध जातीच्या वृक्षांच्या रोपवाटिका तयार केल्या तर एक चांगला उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकतो. नर्सरी सुरू करणा-या सुशिक्षित बेरोजगार युवकांना शासनाने व कृषी विभागाचने मदत व सहकार्य करावे अशी अपेक्षा बार्शी तालुक्यातील गोरमाळे येथील पदवीधर शेतकरी प्रमोद बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.
फोटो ओळी- गोरमाळे ता.बार्शी येथील बेरोजगार युवक प्रमोद बनसोडे यांनी तयार केलेली सीताफळाची नर्सरी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा