" ग्राम परिवर्तन" संकल्पने साठी गावकऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करावे.....पो.नि. सुरेश निंबाळकर
बेंबळे। प्रतिनिधी।
ऑपरेशन" ग्राम परिवर्तन" या संकल्पनेला प्रत्यक्षात मूर्त स्वरूप आणण्यासाठी टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी टेंभुर्णी गट हद्दीत असलेल्या बेंबळे गावी भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली व सविस्तर माहिती सांगितली. याप्रसंगी पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर म्हणाले की 'माझे गाव माझी सुरक्षा' अंतर्गत गावातील दारू, मटका ,जुगार, वेश्याव्यवसाय आदी अवैध धंद्यांचा समूळ उच्चाटन करणे हे पोलिसांचे ध्येय आहे, परंतु यासाठी आम्हाला ्थानिक गावकर्यांची साथ मिळणे अत्यंत मोलाचे ठरणार आहे. यापुढे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत लोकांना जागृत करण्यासाठी गावाच्या मध्यभागी' सायरन' बसवण्यात येतील तसेच चोरी किंवा इतर गुन्हेगारीचा तात्काळ शोध व्हावा म्हणून व गुन्हेगार तातडीने पोलिसांच्या हाती लागावा यासाठी गावातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत, गावातील नागरिकांनी सुरक्षिततेसाठी पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक आहे.
कोरोना महामारी विषयी बोलताना निंबाळकर म्हणाले की माझे कुटुंब माझी सुरक्षा हे शासनाचे ध्येय समोर ठेवून प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. बाहेर फिरताना मास्क वापरा, वेळोवेळी हात पाय स्वच्छ धुवा, गर्दी न करता सण उत्सव साजरे करा, निष्कारण रिकामे फिरू नका, लसीकरण करून घ्या व आगामी गणेशोत्सवामध्ये 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना कायम ठेवा. मिरवणूक काढू नका, गणेश स्थापना, दररोजची पूजा- आरती व अखेरच्या दिवशी गणेश विसर्जनासाठी गर्दी करू नका व पोलिसांना सहकार्य द्या.
याप्रसंगी उपसरपंच नाना भोसले ,ग्रामपंचायत सदस्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी, बीट कॉन्स्टेबल हजारे, माने-देशमुख, अशपाक शेख, गुटाळ, मेजर खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पोलीस पाटील बिभीषण कीर्ते यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा