Breaking

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१

राजेंद्रकुमार गुंड यांचे डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन ॲन्ड जर्नालिझम परीक्षेत यश




राजेंद्रकुमार गुंड यांचे डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन ॲन्ड जर्नालिझम परीक्षेत यश


माढा / प्रतिनिधी - माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीचे रहिवासी व माढा प्रेस क्लबचे विद्यमान उपाध्यक्ष तथा आदर्श शिक्षक राजेंद्रकुमार बाळू गुंड यांनी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने सन 2021 मध्ये घेण्यात आलेल्या "डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन ॲन्ड जर्नालिझम" या परीक्षेत 95.50 टक्के गुण प्राप्त करून उज्ज्वल यश संपादित केले आहे.

राजेंद्रकुमार गुंड यांनी भूगोल व हिंदी विषयांतून बीए ची पदवी विशेष प्राविण्यासह आणि भूगोल व मराठी विषयांतून एमए चे शिक्षण पूर्ण केले असून प्रथम श्रेणीत बीएड चा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.ते श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ निमगाव (टें) या संस्थेत सन 2000 पासून अध्यापनाचे कार्य करीत आहेत.सन 2020 मध्ये शालेय पदविका व्यवस्थापन अभ्यासक्रमाचा कोर्स पूर्ण केला.एक पूरक छंद जोपासण्यासाठी त्यांनी सन 2015 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात दैनिक माणदेशनगरी या वृत्तपत्राच्या माध्यमातून सुरुवात केली त्यानंतर मे 2018 पासून दैनिक पुण्यनगरी मध्ये ते यशस्वीपणे आजतागायत कार्यरत आहेत.पत्रकारितेच्या क्षेत्रातील बारकावे,वस्तुनिष्ठ माहिती मिळावी, अधिकृत शैक्षणिक पात्रतेचा कोर्स पूर्ण करावा या उद्देशाने त्यांनी हा डिप्लोमा पूर्ण केला आहे.

पत्रकार राजेंद्रकुमार गुंड यांनी शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महात्मा गांधी साक्षरता मिशन बीड यांच्या वतीने दिला जाणारा 'ज्ञानमिञ' हा पुरस्कार 2 वेळा मिळाला.डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने दिला जाणारा "महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार" मिळाला आहे.माढा रोटरी क्लबच्या वतीने दिला जाणारा "राष्ट्राचे शिल्पकार" पुरस्कार मिळाला आहे.गीतांजली कला महोत्सव अंबाजोगाई यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय उपक्रमशील कलाध्यापक पुरस्कार मिळाला आहे.महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने सन 2018 ला "कृतीशील शिक्षक पुरस्कार" प्राप्त झाला आहे.विशेष बाब म्हणजे सन 1996 साली माढा येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळालेला आहे.सन 2019 मध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कर्मयोगी आमदार बबनरावजी शिंदे राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार प्राप्त झाला आहे.त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात शैक्षणिक,सामाजिक,कृषी, औद्योगिक,राजकीय,आरोग्य,क्रिडा, पर्यावरण आदी विषयांवर वस्तुनिष्ठ पद्धतीने लेखन केले त्यामुळे अल्पावधीतच माढा तालुक्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांची वेगळी ओळख व नावलौकिक झाला आहे. या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन माढा प्रेस क्लबचे पदाधिकारी व सदस्य, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,मानेगाव परिसरातील नेतेमंडळी,युवक आणि नातेवाईकांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा