हर घर दस्तक आणि सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिमेस तडवळे मध्ये प्रारंभ
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
कोविड-19 लसीकरण कार्यक्रम अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कातरखटाव उपकेंद्र बोंबाळे मार्फत तडवळे ( ता खटाव ) येथे हर घर दस्तक मोहिमेस प्रारंभ झाला असून या अंतर्गत गावातील अद्याप एकही डोस लसीकरण न झालेले अथवा दुसरा डोस देय असणाऱ्या लाभार्थ्यांना शोधून लसीकरणास प्रवृत्त करण्यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि स्वयंसेवकांमार्फत घरोघरी जाऊन समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत संशयित क्षय रुग्ण शोधून त्यांना औषधोपचाराखाली आणण्यासाठीही सर्वेक्षण करण्यात येत आहे. यावेळी सदर मोहिमेस नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसात देत कोरोना लसीकरण घेण्यास प्राधान्य दिले. यावेळी तडवळे येथे आज २० नागरिकांना कोविशील्ड लसीचा प्रथम डोस तर ९२ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला.
प्राथमिक आरोग्य केंद्र कातरखटावचे प्रथम वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली चव्हाण आणि द्वितीय वैद्यकीय अधिकारी डॉ श्री बंडगर व सरपंच डॉ. प्रकाश पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली तडवळे येथे सदर मोहिमेस सुरुवात झाली असून आशा सेविका योगिता काळे, यास्मिन शेख व आरोग्य सेवक श्रीकांत माळवे आणि स्वयंसेवकामार्फत घरोघरी जाऊन ग्रामस्थांना कोरोना लसीकरणाबाबत माहिती देत आहेत. दोन आठवडे किंवा अधिक कालावधीचा खोकला जोखिमग्रस्त आजारी असलेल्या व्यक्तीस खोकला ,ताप ,वजनात घट इत्यादी लक्षणे आढळणाऱ्या नागरिकास प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संदर्भित करण्याबाबत आशा सेविकेच्या मार्फत सर्वेक्षण चालू आहे. सदर सर्वेक्षणासाठी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणे सहकार्य करीत आहेत.
यावेळी ग्रा प सदस्य गणपतराव खाडे पाटील, बाळासो पवार, मालन साबळे, अलका पळे आणि रुपाली खाडे आदींनी यामध्ये सहभाग घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा