अतिक्रम हटवण्यासाठी मढेवडगाच्या सरपंचांसह सदस्य व ग्रामस्थांचे राष्ट्रीय महामार्ग रोको..
श्रीगोंदा-नितीन रोही,
दि.१२: मढेवडगाव ता. श्रीगोंदा येथील गट. नं. ४४५ व ४४६ मधून जाणारा पूर्वापार वहीवाटीचा पाणंद रस्ता व आठवडे बाजाराच्या जागेत गावातील एका बड्या राजकीय नेत्याने व त्याच्याच कुटुंबातील ग्रामपंचायत सदस्याने अतिक्रमण केले असल्याने ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांचे मनमाड-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर मढेवडगाव येथे शनिवार दि.२० रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत ग्रामपंचायत कार्यालय, सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार, श्रीगोंदा पोलिस निरीक्षक, अधीक्षक भूमी अभिलेख अहमदनगर,उपअधीक्षक भूमी अभिलेख श्रीगोंदा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे की मढेवडगाव येथील एका राजकीय नेत्याने व त्याच्याच कुटुंबातील ग्रामपंचायत सदस्याने गट. नं. ४४५ व ४४६ येथून गावठाणाकडे जाणारा पाणंद रस्ता व आठवडे बाजारासाठी असलेल्या जागेवर अतिक्रमण केलेले आहे. ही अतिक्रमित जागा खुली करण्यासाठी शासन परिपत्रक क्रं. जमीन०३/२००९/प्र.क्र.१३/ज-१ दि. सप्टेंबर २०१० आदेशानुसार ग्रामपंचायत कार्यालयाने भूमिअभिलेख कार्यालयाकडे रीतसर फी भरून मोजणी केली व हद्द खुणा दाखविण्यासाठी पोलीस संरक्षणही मागविले होते. मात्र अतिक्रमण केलेला राजकीय नेता मोठ-मोठ्या राजकीय नेत्यांमार्फत अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याने मोजणी होऊनही भूमिअभिलेख कार्यालय हद्द खुणा निश्चित करत नाही. तहसीलदार व मंडळ अधिकारी यांनी स्थळ पाहणी करूनही कार्यवाही होत नाही व वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण, तहसील कार्यालयात उपोषण आंदोलन व सतत अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासकीय पाठपुरावा करूनही गावातील राजकीय नेता वेगवेगळे तंत्र वापरून प्रशासनावर दबाव आणत असल्याने सरपंच व ग्रामस्थांनी शुक्रवार दि.११रोजी निवेदन देत नगर- दौंड राष्ट्रीय महामार्गावर मढेवडगाव येथे शनिवार दि.२० रोजी स.९ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत खासदार सुजय विखे यांनी वेळोवेळी प्रशासनाला कार्यवाही करण्याच्या सूचना देऊनही प्रशासन दबावात ढिम्मपणे चालढकल करत आहे. असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायत कार्यालयाच्या अधिकृत निवेदनावर सरपंच महानंदा मांडे, उपसरपंच दीपक गाडे, प्रा. फुलसिंग मांडे, अंबादास मांडे, गेना मांडे, साहेबराव उंडे, संदीप मांडे, राजेंद्र उंडे, राजेंद्र शिंदे, गणेश मांडे, अमोल गाढवे, लक्ष्मण मांडे, बापू बर्डे, काळूराम ससाणे, भगवान धावडे, व अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत व संपूर्ण गाव रास्ता रोको आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा