Breaking

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

प्रेस क्लबचे धरणे आंदोलन यशस्वी....मागण्या तोंडी मान्य केल्या...



प्रेस क्लबचे धरणे आंदोलन यशस्वी....मागण्या तोंडी मान्य केल्या...


श्रीगोंदा:प्रतिनिधी,

तुम्ही पत्रकार भवन साठी जागा उपलब्ध करून घेतली तर, भवन बांधण्यासाठी आमदार निधीतून २५ लाख रुपये देण्याची तयारी माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी दाखवताच, माजी नगराध्यक्ष गटनेते मनोहर पोटे यांनी शहरातील ३ जागा सुचवल्या. शेवटी पंत नगर मधील मोकळ्या भूखंड वर पत्रकार राजी झाले आणि मनोहर पोटे यांनी या जागेवर पत्रकार भवन बांधण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे मान्य केल्यानंतर, श्रीगोंदा प्रेस क्लब वतीने येथील तहसील कार्यालयासमोर सोमवार दिनांक ३ जानेवारी २०२२ रोजी सुरू केलेले धरणे आंदोलन मागे घेतले.


श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकारांनी अनेक राजकारण्यांचे राजकीय बस्तान बसविण्यात सिंहाचा वाटा उचलला. मात्र, येथे पत्रकारांना बसण्याची सोय नाही. यासाठी पत्रकार भवन आणि वसाहत बाबतची १५ वर्षांपासून मागणी होत होती, दरवर्षी ६ जानेवारीला पत्रकार दिनी नेते मंडळी पत्रकारांना पत्रकार भवनाबाबत घोषणा करायचे आणि गुलाबपुष्प, डायरी, पेन देऊन बोळवण करायचे त्यामुळे यावर्षी ६ जानेवारीला पुन्हा असे घडू नये. म्हणून, दीड महिन्या पूर्वी नव्याने स्थापन झालेल्या श्रीगोंदा प्रेस क्लब वतीने ३ जानेवारी रोजी पत्रकार भवन, वसाहत, नेत्यांचे तसेच अधिस्वीकृती कार्ड बाबत नियम शिथिल व्हावे, पत्रकारांना निवृत्ती वेतन, मानधन, आणि पत्रकार हल्ला विरोधी कायदा प्रभावी अंमलबजावणी साठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन अध्यक्ष विशाल चव्हाण, सचिव मीरा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी आंदोलकांची आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, मा.नगराध्यक्ष, गटनेते मनोहर पोटे, सतीश मखरे, प्रशांत गोरे, सहकार विकास मंडळाचे जितू शेठ मगर, दीपक नागवडे, तहसीलदार मिलिंद कुलथे, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, मुख्याधिकारी मंगेश देवरे, गटविकास अधिकारी शेलार,प्रहार संघटनेचे राजेंद्र पोकळे, रिपाइंचे राजू जगताप आदींनी भेट घेतली.

यावेळी आमदार पाचपुते यांनी २५ लाख रुपये तर, जितू मगर यांनी बांधकामात मदत करण्याचा पुनरुच्चार केला.
दरम्यान आंदोलनात ज्येष्ठ पत्रकार प्रा.बाळासाहेब बळे, अध्यक्ष विशाल चव्हाण, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अंकुश शिंदे, अनिल ठवाळ, बाळासाहेब काकडे, मीरा शिंदे, उत्तम राऊत, मुश्ताक पठाण यांनी चर्चेत भाग घेतला. तहसीलदार कुलथे यांनी जागा शोधण्यासाठी साखर कारखाने निवडणुकीनंतर लक्ष घालण्याचे मान्य केले.

यावेळी प्रेस क्लब उपाध्यक्ष विजय उंडे, कार्याध्यक्ष मुश्ताक पठाण, संघटक सुहास कुलकर्णी, प्रवक्ते राजेंद्र राऊत,सदस्य गणेश गाडेकर, अमर छत्तीसे, शरद शिंदे, भीमराव उल्हारे, सह गणेश कविटकर, राजू शेख, भालचंद्र सावंत, चंदन घोडके, अमर घोडके, दादा सोनवणे, अंकुश तुपे, आरिफ शेख, नितीन रोही, अर्षद शेख, योगेश चंदन, अहमद इनामदार, शकील शेख, रमेश गांधी सह तालुक्यातील पत्रकारांनी सहभाग नोंदवला.

यावेळी श्रीगोंदा प्रेस क्लब वतीने (आमदार) बबनराव पाचपुते, (गटनेते) मनोहर पोटे, (तहसीलदार) मिलिंद कुलथे, (पोलीस निरीक्षक) रामराव ढिकले, (मुख्याधिकारी) मंगेश देवरे, (गटविकास अधिकारी) शेलार यांना निवेदन देण्यात आले.


फोटो,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा