Breaking

सोमवार, २३ मे, २०२२

स्वतःला सिद्ध करण्याची तयारी, मेहनत जिद्द व चिकाटीमुळेच स्पर्धा परीक्षेत यश - वैभव शिंदे


स्वतःला सिद्ध करण्याची तयारी, मेहनत जिद्द व चिकाटीमुळेच स्पर्धा परीक्षेत यश - वैभव शिंदे 


बेंबळे ।प्रतिनिधी             

केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग व अन्य स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचे असल्यास मेहनत आणि चिकाटीशिवाय पर्याय नाही. या परीक्षांची तयारी मानसिकदृष्टया करणे गरजेचे असून परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक पातळीवर स्वत:ला सिध्द करणे म्हणजेच स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करणे होय, असे प्रतिपादन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात ७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या वैभव भाऊराव शिंदे यांनी  केले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत निमगाव टें ता.माढा येथील वैभव भाऊराव शिंदे यांनी राज्यात ७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन वर्ग-१ अधिकारी पदाचे यश संपादन केल्याबद्दल आज मराठा सेवा संघाच्या वतीने त्यांचा पुस्तक भेट देऊन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तथा ग्रामसेवक संघाचे राज्याध्यक्ष शिवश्री तात्यासाहेब पाटील, माढा तालुकाध्यक्ष शिवश्री निलेश देशमुख, उपाध्यक्ष तथा निमगाव टें चे ग्रामविकास अधिकारी रामभाऊ मिटकल, ग्रामसेवक संघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी लोकरे यांच्या  हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी ते बोलत होते. वैभव शिंदे यांचे वडील पिंपळनेरचे केंद्रप्रमुख शिवश्री भाऊराव शिंदे यांचाही मराठा सेवा संघाच्या वतीने सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी शासनाच्या अनेक संस्था आहेत. या संस्थांमध्ये परीक्षेची संपूर्ण तयारी करुन घेतली जाते. स्पर्धा परीक्षेसाठी आर्थिक स्तर महत्वाचा नसून मनाची तयारी महत्वाची असते. नियमित वाचन, भाषेवर प्रभुत्व, नोटस् काढणे, गट चर्चा याबाबी स्पर्धा यश मिळविण्यासाठी गरजेच्या आहेत.जिद्द, मेहनत, नियोजन, मानसिक तयारी , न्युनगंड न बाळगणे व स्वत:ला सिध्द करण्याचे प्रामाणिक प्रयत्न यामुळे स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळते असे यावेळी वैभव शिंदे यांनी बोलताना सांगितले.

फोटो ओळ :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात ७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या वैभव शिंदे यांचा सत्कार करताना मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटिल, तालुकाध्यक्ष निलेश देशमुख, उपाध्यक्ष रामभाऊ मिटकल, शिवाजी लोकरे आदी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा