Breaking

मंगळवार, २८ जून, २०२२

करमाळा तालुक्यातील गौंडरे येथे विवाहितेची अज्ञात कारणाने चिमुकल्या मुलासह पेटवून घेऊन आत्महत्या**



*करमाळा तालुक्यातील गौंडरे येथे  विवाहितेची अज्ञात कारणाने चिमुकल्या मुलासह पेटवून घेऊन आत्महत्या*
**

करमाळा:  प्रतिनिधी 

तालुक्यातील गौंडरे येथे एका विवाहितेने अज्ञात कारणाने तीन वर्षीय चिमुकल्या  मुलासह पेटवून घेऊन आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 
संध्या दत्तात्रय आंबारे ( वय २२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर शंभू दत्तात्रय आंबारे वय तीन वर्षे असे मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे. 

आज ता.28 जून रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना 


घरापासून काही अंतरावर शेतात घडली आहे.  आत्महत्येचे कारण अद्याप  समजलेले नाही. घटनेची माहिती समजताच त्याच परिसरात तपासावर असलेले करमाळ्याचे  उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे व पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी घटनास्थळी भेट दिली.मयताची पाहणी व पंचनामा करून दोघांचे शव शवविच्छेदनासाठी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले . 


 संध्या आंबारे या विवाहितेने चिमुकल्या मुलासह आत्महत्या केलेल्या वेळी मयत विवाहितेचा सासरा अंगंद लिंबा आंबारे हे विवाहितेचा अंगणवाडी येथे शिकत असलेल्या मोठा साडेचार वर्षे वयाचा राजवीर दत्तात्रय आंबारे या मुलाला शाळेतुन आणण्यासाठी गेले होते.विवाहितेची सासू मुलीकडे पंढरपूर येथे गेली होती  तर विवाहितेचा पती दत्तात्रय अंगद आंबारे (वय 25) हे गवंडी काम करत असून तो पाथुर्डी येथे कामासाठी गेला होता.  
 आंबारे कुटुंबिय हे सांप्रदायिक व धार्मिक  आहेत. तरीही असली घटना घडल्याने गौडंरे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
दत्तात्रय अंगद आंबारे यांना दोन मुले आहेत. त्यातील एक मोठा मुलगा राजवीर दत्तात्रय आंबारे हा गावात अंगणवाडीत जातो तर दुसरा लहान मुलगा शंभू दत्तात्रय आंबारे लहान असल्याने आई सह घरीच राहत होता. आज दुपारी घरी कोणी नसल्याचे पाहून  संध्या दत्तात्रय आंबारे यांनी पोटचा तीन वर्षीय मुलगा शंभू यांच्यासह पेटवून घेऊन आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने गौडंरे गावात शोककळा पसरली आहे. 
आत्महत्येचे स्पष्ट कारण अद्याप समजलेले नाही. घटनेची माहिती समजताच डॉ. विशाल  हिरे व सूर्यकांत कोकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यातील मृतदेह करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले आहे. याचा पुढील तपास  पोलिस निरीक्षक सूर्यकांत  कोकणे हे करत आहे.

चौकट 

नेर्ले तालुका करमाळा येथे जबरी चोरी प्रकरणी तपासासाठी पोलिस निरिक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह घटनास्थळी भेट दिली होती. यावेळी गौडंरे येथे आत्महत्येची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालो असता एक विवाहिता ही लहान मुलासह शंभर टक्के जळालेल्या अवस्थेत घरापासून थोड्या अंतरावर शेतात मृत झालेले आढळून आले. यावेळी त्यांचे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले असुन शवविच्छेदन अहवाला नंतरच मृत्युचे कारण स्पष्ट होणार आहे. सध्या करमाळा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

....डाॅ.विशाल हिरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, करमाळा 

***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा