समविचारी पक्षाशी विचार विनिमय करून पुढील राजकीय दिशा ठरवणार...... संजयबाबा कोकाटे
...शुक्रवारी टेंभुर्णी येथे महाबैठकीचे आयोजन....
सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मी काही अपरिहार्य तडजोडी मुळे माढा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. मी पराभूत झालो परंतु मला 76 हजार मते मिळाली ही वस्तुस्थिती आहे. ही मते मला मिळवून देण्यात माझे बरोबरचे समविचारी पक्ष नेते कार्यकर्ते या सर्वांशी मी विचारविनिमय करून, सद्य परिस्थितीमध्ये मी माझ्या पुढील राजकीय कारकिर्दीची दिशा ठरवणार आहे व यासाठी शुक्रवार दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 11 वाजता टेंभुर्णी तालुका माढा येथील 'ओम साई मंगल कार्यालयात' सर्वांची बैठक बोलवली आहे व यातील चर्चेनंतर मी माझी पुढील राजकीय दिशा जाहीर करणार आहे .या बैठकीसाठी मी शिवसेना, भाजप , रयत क्रांती संघटना, मनसे रासप,बळीराजा संघटना, व माझे हितचिंतक या सर्वांना आमंत्रित केले आहे असे प्रतिपादन माढा तालुक्यातील शिवसेनेचे धडाडीचे नेते संजयबाबा कोकाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले आहे.
अधिक बोलताना संजय बाबा कोकाटे म्हणाले की सध्या राज्यातील राजकीय अस्थिरता व गोंधळ माझ्यासहित कोट्यावधी जनता पाहात आहे. शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या गटातील कांहीमंत्र्यासहित 40 आमदार व 9 खासदार हे सर्व शिवसेनेचेच कॅबिनेट मंत्री असलेले माननीय एकनाथ शिंदे यांचे गटात सामील झाले आहेत. यातील प्रत्येकाचे एकच म्हणणे आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या बाजूला असलेली चांडाळ चौकडी शिवसेनेचे निष्ठावंत मंत्री, आमदार, कार्यकर्ते यांचा विचारच करुदेत नाहीत व तसेच उद्धव साहेबांना महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ मंत्री हेच मोलाचे सल्लागार वाटतात. त्यामुळे मागील दोन ते अडीच वर्षात आमच्याच नेत्याकडून आमची प्रचंड मुस्कटदाबी झालेली आहे व म्हणून आम्ही एकनाथ शिंदे यांचे बरोबर जात आहोत.
संजय बाबा कोकाटे पुढे म्हणाले की माढा विधानसभा मतदार संघातील रस्ते ,वीज, पाणी ,शिक्षण,आरोग्य आदी बाबत मी सेनेच्या वरिष्ठ मंत्र्याबरोबर मंत्रालयात जाऊन अनेक वेळा बोललो, निवेदने दिली, विकास कामाचे आराखडे सादर केले, जनतेच्या अडचणी विशद केल्या परंतु माझ्या मागण्यांना न्याय देण्यापेक्षा हेच वरिष्ठ कामे करून देण्यात हतबलता दाखवत होते व म्हणत होती की कोकाटे साहेब आम्हाला सर्व पटते आहे पण वरिष्ठांच्या पुढे किंवा श्रेष्ठींच्या पुढे आमचा इलाज चालत नाही कारण ते सर्व जण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सल्लागारांच्या तालावर राज्य चालवत आहेत ही सद्यस्थिती आहे असे स्पष्ट सांगत होते. त्यामुळे आमच्या कोणत्याही कामाचा योग्य व रास्त प्रकारे विचार झाला नाही ही वस्तुस्थिती आज आमच्या बाबतीत कोणी नाकारत नाही व म्हणून ज्या मंत्री, आमदार-खासदारांनी बंड केले व शिंदे गटाचा आश्रय घेतला त्यांचेशी मी पूर्णसहमत आहे.
तालुक्यात काही ठिकाणी माझ्या या विचाराशी सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी असहमती दर्शवून माझ्या व सावंत सर यांच्या पोस्टरवर काळा रंग फासण्याचे काम केले परंतु अशा लोकांना आम्ही फारसे महत्त्व देत नाहीव अशा लोकांना आगामी थोड्याच दिवसात राज्यातील राजकारणाची सत्य वस्तुस्थिती समजून येईल. माढा तालुक्यातील शिवसेनेचे नेते शिवाजी सावंत व त्यांचे बंधू व सध्या मराठवाड्यातील आमदार तानाजी सावंत यांचे बरोबरच मी राहणार आहे. संजयबाबा कोकाटे पुढे म्हणाले की मी मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा नेहमीच आदर करतो आहे ,त्यांचे विचार सकारात्मक आहेत परंतु महाविकास आघाडीतील इतर पक्षांच्या सल्लागारामुळे व दबावामुळे उद्धव साहेबांची प्रचंड कुचुंबपणा होत आहे व त्यामुळेच शिवसेनेचे मंत्री आमदार, खासदार व कार्यकर्ते प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत व त्याचा आता उद्रेक झालेला आहे . एकनाथ शिंदे यांच्या विचाराशी या सर्वांनी सहमती दर्शविली आहे आणि मी पण त्यांच्याशी सहमत आहे .
याप्रसंगी संजय बाबा कोकाटे यांनी सेनेच्या काही वरिष्ठ मंत्र्याकडे मतदारसंघातील विकास कामाची केलेली मागणी व काम का होत नव्हते याची वस्तुस्थिती स्पष्टपणे विशद केली व ठामपणे सांगितले की उद्धव साहेबांच्या बद्दल मला नितांत आदर असला तरी परंतु सध्या माझे राजकीय अस्तित्व माढा विधानसभा मतदारसंघातील जनतेला समजून सांगण्यासाठीच मी शिंदे गटाशी सकारात्मक असून जनतेला समजावून सांगण्यासाठी मी या मोठ्या बैठकीचे आयोजन करत आहे. याप्रसंगी संजयबाबा कोकाटे यांनी आजपर्यंत त्यांच्यावर स्थानिक नेतृत्वाकडून झालेल्या अन्याय, खोट्या पोलीस केसेस , मतदार संघात माझी व माझ्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी, मी स्वतः मंजूर करून आणलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचे प्रकार व माझ्या बद्दल गैरसमज पसरवून जनतेची दिशाभूल करणारे वातावरण कसे निर्माण केले गेले याबद्दल अनेक प्रकारची वस्तुस्थितीजन्य उदाहरणे देऊन यावेळी माहिती सांगितली.
संजयबाबा कोकाटे म्हणाले की प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया व इतर प्रसिद्धी माध्यमाच्या सर्व बंधू-भगिनींनी माढा विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी रस्ते, शिक्षण ,आरोग्य या मूलभूत सुविधा मतदारसंघात भरगच्च प्रमाणात व्हाव्यात यासाठी व तसेच महसूल सहित इतर कोणत्याही खात्यामध्ये शिपायापासून अधिकाऱ्यापर्यंत होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरुध्द आवाज उठवावा व जनतेला वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी या पुढे प्रसिद्धी माध्यमांचा वापर करावा असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा