चव्हाण दांपत्याचा शिवसृष्टी देवराईत मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त 400 वृक्ष लागवडीचा संकल्प
एप्रिल 2019 रोजी पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेच्या वेळी हे दांपत्य याच ठिकाणी झाले होते विवाहबद्ध
मृदा,जल व पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने धडपडणारे जामगावचे दाम्पत्य
माढा / प्रतिनिधी -माढा तालुक्यातील जामगाव येथील कुमार उत्तम चव्हाण व अमृता कुमार चव्हाण या दाम्पत्यांचा 27 एप्रिल 2019 रोजी सत्यमेव जयते पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेच्या वेळी शिवसृष्टी देवराई येथील माळरानावर जल व मृदयसंधारणाची कामे करीत असताना बैलगाडीतून वाजत-गाजत आणून हजारोंच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला होता विशेष बाब म्हणजे याच दांपत्याची मुलगी धनश्री चव्हाण हिचा पहिला वाढदिवस त्याच माळरानावर वृक्षारोपणाने साजरा केला असून 400 वृक्ष लागवडीचा संकल्प या दांपत्याने केला आहे.विशेष बाब म्हणजे या दांपत्याने आजतागायत मृदा,जल व पर्यावरण संवर्धनासाठी वेळोवेळी कृतीयुक्त योगदान दिले आहे त्यामुळे त्यांच्या या अभिनव व अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र तोंडभरून कौतुक होत आहे.
आजच्या आधुनिक युगामध्ये अनेक पालक आपल्या मुला-मुलींचा वाढदिवस मोठमोठे हॉटेल्स,रिसॉर्ट, लॉन्स,मंगल कार्यालये आदी ठिकाणी लाखों रुपये खर्चून मोठ्या दिमाखात व डामडौल करीत झगमगाटात साजरा करतात परंतु या ग्रामीण भागातील दांपत्याने जो मृदा,जल व पर्यावरण संवर्धनाचा वसा हाती घेतला आहे त्याला कृतियुक्त पुष्टी देण्यासाठी मुलीचा वाढदिवस ज्या माळरानावर ते विवाहबद्ध झाले होते त्याच ठिकाणी अगदी साधेपणाने कोणताही डामडौल व झगमगाट न करता वृक्षारोपणाने साजरा केला ही बाब निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. विशेष बाब म्हणजे या विधायक उपक्रमासाठी दृष्टीहीन असलेले मालोजी चव्हाण यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे.
यावेळी मार्केट कमिटीचे उपसभापती सुहास पाटील-जामगावकर,चेअरमन रमाकांत कुलकर्णी,गोपीनाथ गवळी, शंकर चव्हाण,हनुमंत घोडके, रजनीकांत राऊत,प्रवीण सातपुते, मालोजीराजे चव्हाण,संभाजी चव्हाण, समाधान चव्हाण,अभिजीत चव्हाण, शाहीर चव्हाण,मार्तंड जगताप,सुरज चव्हाण,इंद्रजीत चव्हाण,मनमत गायकवाड,गौतम चव्हाण,मनीषा चव्हाण,सोनाली चव्हाण,अमृता चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ व नातेवाईक उपस्थित होते.
- चौकट - या चव्हाण दाम्पत्याने पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेच्या वेळी प्रत्यक्ष श्रमदान करून मृदा व जलसंधारणाची कामे केली. माळरानावर श्रमदानाच्या वेळी अत्यंत साधेपणाने विवाह करून एक नवीन आदर्श निर्माण केला.गावाचा परिसर निसर्गरम्य व हिरवागार निर्माण व्हावा म्हणून शिवसृष्टी देवराई येथे त्यांनी धनश्रीचा पहिला वाढदिवस आंबा, चिकू आदी फळझाडांच्या वृक्षारोपणाने केला असून त्यांनी 400 वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे ही बाब निश्चितच कौतुकास्पद असून इतरांनीही आपल्या मुला-मुलींचे वाढदिवस अनावश्यक बाबींवर खर्च न करता साधेपणाने अशा प्रकारे विधायक व पर्यावरण पूरक कामे करून साजरे करावेत अशी अपेक्षा मार्केट कमिटीचे उपसभापती सुहास पाटील यांनी व्यक्त केली आहे.
फोटो ओळी- जामगाव ता.माढा येथे चिमुकली धनश्री चव्हाण हिच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करताना चव्हाण दांपत्य बाजूला मार्केट कमिटीचे उपसभापती सुहास पाटील, मालोजी चव्हाण व इतर मान्यवर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा