माढा तालुका 100 टक्के ओलीताखाली आणण्याचेआमदार बबनदादा शिंदे यांचे उद्दिष्ट
माढा / प्रतिनिधी -माढा तालुक्यातील सर्व भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध व स्वावलंबी व्हावा या उद्देशाने आमदार बबनराव शिंदे यांनी आजतागायत आपली आमदारकी पणाला लावून सन 1995 पासून शासन दरबारी विशेष प्रयत्नांची पराकाष्टा करीत भिमा-सीना जोड कालवा,सीना-माढा उपसासिंचन योजना, शिंदे कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने बेंद ओढा प्रकल्प यशस्वीपणे राबविले आहेत परंतु माढा तालुक्यातील काही गावे आजही शेतीच्या पाण्यासाठी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.यासंबंधी संबंधित गावातील स्थानिक नेतेमंडळी व शेतकऱ्यांनी आमदार शिंदे यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली आहे.
हाच धागा पकडत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार कुर्डूवाडी येथे माजी आमदार (कै.) विठ्ठलराव शिंदे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावराप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना आ.बबनराव शिंदे यांनी खा.शरदचंद्र पवार यांच्याकडे सीना नदीवरील खैराव येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यातून सर्वेक्षण झालेली मानेगाव उपसासिंचन योजना मार्गी लावण्यासाठी तसेच बार्शी उपसासिंचन योजनेत समाविष्ट माढा तालुक्यातील पाच गावांना आणि सीना-माढा उपसासिंचन योजनेत नव्याने समाविष्ट होऊन सर्वेक्षण झालेल्या विविध गावांना शेतीसाठी पाणीपुरवठा व्हावा याकरिता आपण शासनाकडे पाठपुरावा करून मदत व सहकार्य करण्याची आग्रही मागणी केली.आजपर्यंत माढा तालुक्यात 80 ते 90 टक्के क्षेत्र ओलिताखाली आले आहेत परंतु उर्वरित 10 ते 20 टक्के क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी या योजना कार्यान्वित झाल्यास माढा तालुका 100 टक्के ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे.
मानेगाव उपसासिंचन योजनेतून पूर्व भागातील मानेगाव,खैराव,बुद्रुकवाडी, धानोरे, कापसेवाडी-हटकरवाडी या गावातील 5 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.बार्शी उपसासिंचन योजनेत समाविष्ट झालेल्या जामगाव,अंजनगाव उमाटे, वडाचीवाडी,तांदुळवाडी,दारफळ सीना या भागातील शेकडो एकर क्षेत्र लागवडीखाली येण्यास मदत होणार आहे.सिना-माढा उपसासिंचन योजनेत नव्याने समाविष्ट केलेल्या बाबी,अंजनगाव खेलोबा,गोरेवाडी आदी गावांतील शेकडो एकर क्षेत्र नजीकच्या भविष्यकाळात ओलिताखाली आल्यास माढा तालुक्यात शंभर टक्के हरितक्रांतीचे स्वप्न साकार होईल असे त्यांनी सांगितले आहे.
फोटो ओळी-आमदार बबनराव शिंदे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा