घोटी बेंबळे परिसरात बिबट्याचा वावर ...
वनरक्षक अधिकाऱ्याकडून अक्षम्य टोलवाटोलवी.. नागरिक मात्र भयभीतः
सर्वांनी आपल्या कुटुंबाची व पशुधनाची काळजी घ्यावी ..........आमदार बबनदादा शिंदे
बेंबळे।प्रतिनिधी।
घोटी व बेंबळे परिसरात बिबट्याचा वावर दिसून आलेला असून मागील दोन दिवसापासून बिबट्याने म्हशीचे रेडूक, कुत्रे आणि कोंबड्यांचा फडशा पाडला आहे. सविस्तर वृत्तांत असा की बेंबळे, घोटी, कान्हापुरी परिसरातून मागील 40 वर्षापासून उजनीचा डावा कालवा वाहत असून पश्चिमेला भीमा नदीचे विशाल पात्र असल्यामुळे या भागातील हजारो एकर क्षेत्रात ऊस केळी डाळिंब द्राक्ष आंबा पेरू आदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत आहे ,यामुळे गावात जुनी घरे किंवा जागा असली तरी 90% शेतकरी आपापल्या शेतात घरे बांधून राहत आहेत. या सद्य परिस्थितीमुळे मागील तीन-चार वर्षांपासून वन्य प्राण्यांचा वावर या भागात सातत्याने दिसून येत आहे. मागील दोन-तीन दिवसांपूर्वी कान्हापुरी- घोटी रस्त्यालगत असलेल्या विष्णु शाहू भोसले यांच्या वस्तीवरील कुत्रा आणि एका म्हशीच्या रेडकाचा बिबट्याने फरशा पडला होता.हाच बिबट्या पुढे घोटी -बेंबळे शिवे वरील गट नंबर 85 येथे राहणाऱ्या नागनाथ मनोहर काळभोर
या बागायतदारांच्या वस्तीवर रात्री दहा ते साडेदहाची सुमारास आलेला होता कारण अचानक कुत्रे भुंकणे सुरू झाले असता नागनाथ काळभोर हे घराच्या व्हरांड्यात आले व त्यांना अवघ्या २०-२५ फुटावर घराच्या पुढून बिबट्या जाताना दिसला व पुढे तो अंधारात गडप झाला, परंतु थोड्याच वेळात त्यांच्या घराच्या मागे असलेल्या शेळ्या आणि कोंबड्याच्या खुराड्यावर या बिबट्याने हल्ला केला आणि कुंपणाच्या तारा वाकवल्या व पाच सहा कोंबड्यांचा फरशा पडला तेवढ्यात पुन्हा कुत्रा भुंकू लागल्यामुळे घरातील सर्वजण जागे झाल्यामुळे पाच-सहा कोंबड्या जरी मेल्या तरी शेळ्या वरील हल्ला मात्र बिबट्याला करता आला नाही व तो मोठ्या उसात पळून गेला. या ठिकाणी सर्वांना मोडलेली जाळी, वाकलेल्या तारा व तारे वरून खाली घसरताना बिबट्याचे केस स्पष्ट दिसून येत होते. या भागात रात्री पाऊस हि झाला होता, सकाळी नवनाथ गळगुंडे शिवाजी पताळे व रविकांत साळुंखे हे युवा शेतकरी आपला मोठा ऊस सरी वरून दोन्ही बाजू सारण्यासाठी गेले असता प्रत्यक्ष त्यांना समोरून बिबट्या जात असताना दिसला व हाच पुढे पवन कुमार गळगुंडे यांच्या गट नंबर 87 मध्ये उसात गेल्याचे दिसून आले.
सकाळी घोटीचे सरपंच संजय वनवे उपसरपंच राजकुमार साळुंखे यांनी वन खात्याला फोन करून माहिती कळवली. गट नंबर 87 नंतर घोटी बेंबळे चा शिवार असून बिबट्या आता घोटी बेंबळे शिवारात उसात किंवा द्राक्ष किंवा केळीच्या बागेत तो गेला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वन खात्याचे वनरक्षक सुरेश कुर्ले हे दुपारी एक ते दीडचे दरम्यान या ठिकाणी आपल्या सहकार्या सह आले व घोटी बेंबळे शिवेवर त्यांनी 50 ते 60 शेतकऱ्यांच्या समवेत सर्व ठिकाणांची पाहणी केली. त्यावेळेस बेंबळे बीट कॉन्स्टेबल तुकाराम माने- देशमुख, पोलीस मित्र आबा किर्ते बेंबळ्याचे सरपंच विजय पवार भाऊराव मुटेकर ,सज्जन शिंदे बाळासाहेब कुलकर्णी यांचे सहित 50 ते 60 शेतकरी जमा झाले होते. या ठिकाणी उसात बिबट्याच्या पायाचे मोठे ठसे, जाळीच्या कुंपणावर त्याचे केस व काही ठिकाणी त्याची विष्ठा दिसून आली .वनरक्षक कुर्ले यांनी हा बिबट्याच असल्याचे खात्रीशीर सांगितले .
चौकट....
मोहोळचे वनक्षेत्रपाल अधिकारी सतीश उटगे व जिल्हा उपवन रक्षक अधिकारी धैर्यशील पाटील यांना नागरीकांनी मोबाईल वरून बोलण्यासाठी फोन केला असता दोघांनीही बराच वेळ फोन उचललेच नाही. त्यामुळे उपस्थित नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत होता. पिंजरे बसवण्यात यावेच हीच नागरिकांची तीव्र मागणी कळकळीची मागणी आहे.
* सर्वांनी काळजी घ्या आ. बबनदादा शिंदे* *आमदार बबनदादा शिंदे यांना बिबट्याचा वावर होत असल्याची माहिती कळवली असता बबनदादा म्हणाले की मी स्वतः वरिष्ठानकडून त्यांच्याशी चर्चा करून सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे व पिंजरे बसवण्याची सोय करायला लावतो, परंतु रात्री अप रात्री मोटार चालू- बंद करण्यासाठी किंवा पिकांना पाणी देण्यासाठी एक एकट्याने बाहेर पडू नका ,महिला लहान मुले यांना बाहेर पडू देऊ नका, लहान मुले शाळेला जाता येताना त्यांच्याबरोबर पालकांनी जावे- यावे. प्रत्येकाने स्वतःच्या कुटुंबाची व आपल्या पशुधनाची योग्य ती काळजी घ्या. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो परंतु नागरिकांनी आपली काळजी घ्यावी.
चौकट....
सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार..
नंतर बरेच वेळाने जिल्हा उपवनसंरक्षक अधिकारी धैर्यशील पाटील यांचे मोबाईल वरून नागरीकाशी बोलणे झाले असता ते म्हणाले की पिंजरे बसवण्यासाठी आम्हाला नागपूरवरून परवानगी घ्यावी लागते ,तूर्तास आम्ही काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवतो व आम्हाला खात्री वाटताच पिंजरे बसवण्याची सोय करतो.
... अवघ्या वीस किलोमीटरवर पिंजरे उपलब्ध....
अधिक चौकशी केली असता वनरक्षक सुरेश कुर्ले म्हणाले की बेंबळ्यापासून अवघ्या वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर देवाची रांजणी येथे सध्या पिंजरे उपलब्ध आहेत, परंतु त्यांना इथे आणून बसवण्यासाठी नागपूर येथून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परवानगी देणे गरजेचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा