भुकंपग्रस्तांना मालकी प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे
उमरगा उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकार प्राप्त.
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
,दि.08 :- जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी शासनाच्या गतीमान व प्रभावी प्रशासन या धोरणास अनुसरुन भूकंपग्रस्तांना स्थानिक पातळीवर सुविधा देण्याचे दृष्टीने जिल्हयातील उमरगा व लोहारा तालुक्यातील अ व ब - वर्गवारी गावातील भूकंपग्रस्त पात्र लाभार्थी कुटूंबांना भूकंप पुनर्वसन योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या घराचे/भूखंडाचे मालकी प्रमाणपत्र (कबाला) निर्गमीत करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी-उमरगा, जि.उस्मानाबाद यांना प्रदान केलेले आहे. आदेश दि. 06 डिसेंबर 2022 पासून लागू राहतील.
धाराशिव जिल्ह्यातील दि. 30 सप्टेंबर 1993 रोजी झालेल्या प्रलयकारी भूकंपानंतर शासनाने भूकंपग्रस्त गावांचे पुनर्वसन करण्याचा कार्यक्रम तातडीने हाती घेवून भूकंपग्रस्त भागातील उमरगा तालुक्यातील 10 व लोहारा तालुक्यातील 16 अशा एकूण 26 अ-वर्गवारीच्या गावाचे पुर्णत: नव्याने पुनर्वसन करून या गावातील भूकंपग्रस्त लाभार्थी कुटूंबाना शासनाने व स्वंयसेवी संस्थामार्फत बांधण्यात आलेल्या घरांचे वाटप केले आहे. तसेच उमरगा तालुक्यातील 09 व लोहारा तालुक्यातील 03 अशा एकूण 12 ब-वर्गवारीच्या गावातील लाभार्थी कुटूंबांना शासनाच्या घर दुरुस्ती अनुदानातून व अशासकीय संस्थांच्या मदतीने घरे बांधून देण्यात आली होती. अशा कुटूंबांना सदरील घरांचे/भूखंडाचे वाटप केल्यानंतर संबंधित पात्र भूकंपग्रस्त लाभार्थी कुटूंबांना मंजूर घरांचे/भूखंडाचे मालकी प्रमाणपत्र (कबाला) निर्गमित करण्याचे अधिकार सदयस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्तरावर आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा