टेंभुर्णी : - खोटा धनादेश देऊन फसवणूक केल्या प्रकरणी माढा न्यायालयाने एकास ८० हजार रुपये दंडाची व तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.तसेच रक्कम न दिल्यास आणखी दोन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,यातील फिर्यादी शंकर सोपान भरगंडे यांनी त्यांच्या परिचयाचे सूरज महादेव रुपनवर रा.कन्या प्रशालेजवळ टेंभुर्णी ता.माढा यास सप्टेंबर २०१५ मध्ये ६० हजार रुपये एवढी रक्कम हात उसने दिली होती.ती रक्कम रुपनवर याने दोन-तीन महिन्यासाठी हात उसने व परतीच्या बोलीवर घेतली होती.काही दिवसांनी भरगंडे यांनी उसने दिलेली रक्कम रुपनवर यास मागितली असता त्याने साठ हजार रुपयांचा धनादेश दिला होता.तो भरगंडे यांनी बँकेत भरला असता रक्कम नसल्याने धनादेश परत आला होता.
धनादेश परत आल्याने शंकर भरगंडे यांनी ॲड निलेश भोसले यांच्यामार्फत २०१६मध्ये माढा न्यायालयात बनावट धनादेश देऊन फसवणूक केल्याचा कलम १३८ प्रमाणे खटला दाखल केला होता.या खटल्याचा नुकताच निकाल लागला असून माढा येथील वरिष्ठ न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायाधीश जी.व्ही.गांधे यांनी या खटल्यात आरोपी सुरज महादेव रूपनवर यास खोटा धनादेश देऊन भरगंडे यांची फसवणूक केल्याबद्दल त्याचा मोबदला म्हणून ८० हजार रुपये व तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.रक्कम न दिल्यास आणखी दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
या खटल्यात फिर्यादीतर्फे ॲड निलेश भोसले व ॲड पी.एम.संचेती यांनी काम पाहिले.तर आरोपीच्या वतीने एस.के. लोणकर यांनी काम पाहिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा