Breaking

रविवार, ११ जून, २०२३

प्रगतिशील लेखक संघ राज्य अधिवेशनाच्या अध्यक्षपदी भ.मा. परसवाळे तरउद्घाटकपदी हिंदी कादंबरीकार विभूती नारायण राय यांची निवड:



प्रगतिशील लेखक संघ राज्य अधिवेशनाच्या अध्यक्षपदी भ.मा. परसवाळे तर
उद्घाटकपदी हिंदी कादंबरीकार विभूती नारायण राय यांची निवड: 

टेंभुर्णी: १९३६ मध्ये लंडन येथे स्थापन झालेल्या आणि सलग नव्वद वर्षांची परंपरा असणाऱ्या राष्ट्रीय प्रगतिशील लेखक संघाच्या पाचव्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या अध्यक्षपदी विदर्भातले ज्येष्ठ कवी, चित्रकार भ. मा. परसवाळे यांची तर उद्घाटकपदी उत्तर प्रदेशातील हिंदी कादंबरीकार विभूती नारायण राय यांची निवड करण्यात आली आहे. भ. मा. परसवाळे यांचे 'रस्ते दुभंगत आहेत', 'आरोह' हे कवितासंग्रह प्रकाशित असून ‘आरोह’ या कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर विभूती नारायण राय हे हिंदी कादंबरीकार व प्रगतिशील लेखक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते वर्ध्याच्या महात्मा गांधी हिंदी विद्यापीठाचे  माजी कुलगुरू आणि माजी पोलीस महासंचालकही राहिलेले आहेत. त्यांच्या घर, शहर में कर्फ्यू, किस्सा लोकतंत्र का, तबला आणि प्रेम की भूतकथा या  पाच कादंबऱ्या प्रकाशित आहेत. या कादंबऱ्या जवळपास सर्व भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजीत अनुवादित झाल्या आहेत
      १८ जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयात पार पडणाऱ्या या अधिवेशनाचा समारोप कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या हस्ते संपन्न होईल. मराठी समाजाला मराठी चित्रपटाची गरज आहे का? या विषयावर नांदेडच्या डॉ. दिलीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद तर डॉ. राजेंद्र दास यांच्या अध्यक्षीय उपस्थितीत कवी संमेलनाचे आयोजनही या अधिवेशनात करण्यात येणार असल्याची माहिती प्रगतिशील लेखक संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांनी दिली. टेंभुर्णी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  या अधिवेशनास महाराष्ट्राच्या प्रगतिशील लेखक संघाचे कार्याध्यक्ष जी. के. ऐनापुरे तसेच सचिव राकेश वानखेडे हेही उपस्थित राहणार आहेत. परिसंवादात चित्रपट क्षेत्रातील कलावंत, दिग्दर्शक, कवी, कादंबरीकार, नाट्यकर्मी आपले विचार मांडणार आहेत.  
    प्रगतिशील लेखक संघाच्या या राज्य अधिवेशनास साहित्यिक, विचारवंतांनी उपस्थित रहावे असे आवाहन अधिवेशनाचे आयोजक प्रगतिशील लेखक संघ सोलापूरचे उपाध्यक्ष डॉ. रमेश शिंदे आणि सचिव डॉ. दत्ता घोलप यांनी केले आहे. यावेळी पत्रकार परिषदेस महाविद्यालयातील डॉ. संजय साठे, डॉ. दिगंबर वाघमारे, डॉ. बाळासाहेब दास, डॉ. नेताजी कोकाटे, डॉ. राजेंद्र गायकवाड उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा