Breaking

शनिवार, १० जून, २०२३

संघर्षातून परिवर्तन घडवणे ही यशस्वी व आनंदी जीवनाची गुरुकिल्ली...... सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत हंकारे "यशोदीप" तर्फे मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न..



संघर्षातून परिवर्तन घडवणे ही यशस्वी व आनंदी जीवनाची गुरुकिल्ली......


      सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत हंकारे 
"यशोदीप" तर्फे मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न..

 बेंबळे| प्रतिनिधी.                   

            जीवन व्यतीत करत असताना प्रत्येकाने आपल्यातील सुप्त गुणांना चालना देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करुन  स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणणे ही प्रचलित काळाची नितांत गरज किंबहुना आवश्यकता आहे असे विचार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बुद्धिवादी व सर्वांगीण विचारांचे सखोल अभ्यासक व्याख्याते प्राध्यापक वसंत हंकारे यांनी व्यक्त केले आहेत. टेंभुर्णी येथील रोटरी क्लब हॉलमध्ये यशोदीप कॉम्प्युटर एज्युकेशन व यशोदीप फाउंडेशन यांचे वतीने सन 22-- 23 मध्ये पोलीस भरती यूपीएससी एमपीएससी  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उल्लेखनीय यश संपादन केलेल्या मान्यवर व्यक्ती व विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सन्मान सोहळा तसेच करियर मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी प्राध्यापक वसंत हंकारे आपले उद्बोधक विचार व्यक्त करत होते, अध्यक्षस्थानी आमदार संजय मामा शिंदे हे होते. खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बंडूनाना ढवळे भाजपा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे भाजप महिला आघाडी अध्यक्षा धनश्री खटके शिवसेनेचे मधुकर देशमुख दिलीपराव भोसले सचिन जगताप रिपाईचे जयवंत पोळ भाऊसाहेब महाडिक नानासाहेब ढवळे निलेश देशमुख गणेश ढवळे यांचे  सहाय्यक आयुक्त नितेश कदम उपजिल्हाधिकारी विकास व्यवहारे व सहाय्यक नगर रचना अधिकारी सौरभ ताकमोगे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

    यशोदीप चे सर्वेसर्व प्राध्यापक गोरख खटके यांनी मागील सोळा वर्षात यशोदीप ने केलेल्या संघर्षाचा व सध्या होत असलेल्या परिवर्तनशील यशस्वी वाटचालीचा लेखाजोखा याप्रसंगी सादर केला. आपल्या वाटचालीत झालेले कष्ट आलेल्या अडचणी व  अनेक मान्यवरांनी दिलेले वैचारिक व नैतिक पाठबळ याविषयी खटके सर यांनी कृतज्ञता व्यक्त करून सर्व हितचिंतक व उपस्थितांना धन्यवाद दिले .

           प्रमुख व्याख्याते प्राध्यापक वसंत हंकारे 'संघर्षातून यशाकडे... एक आनंदी जीवन' याविषयी बोलताना पुढे म्हणाले की प्रबोधन म्हणजे परिवर्तन नाही, परिवर्तनासाठी जास्त वेळ नसतो काही क्षण देखील पुरेशी असतात, तुमच्यातील सुप्त गुणांना चालना देणारे व शाब्बासकीची थाप देणारे तुमचे आईबाप व हितचिंतक महान असतात, सुप्त गुणांना सिद्ध करण्यासाठी संधीचे सोने करा, अपार कष्ट, जीद्ध चिकाटी व परिश्रमाची सदैव कास धरा. समोर उदात्त ध्येय ठेवून ते साध्य करण्यासाठी पेटून उठा, स्वतःच्या कर्तुत्वावर  ठाम विश्वास ठेवा, अडचणीवर मात करणे शिका रडत बसू नका, वाघासारखे जीवन जगा. संघर्षातूनच यशस्वी ध्येयपूर्तीचा व परिवर्तनाचा आनंद मिळत असतो, यशस्वी होण्यासाठी परिवर्तन घडवून आणणे हीच जीवनाची कसोटी असते . विद्यार्थी व युवका विषयी प्राध्यापक हंकारे म्हणाले की वाघासारखे जीवन जगा, आई-वडिलांना महान पूजनीय माना, तुमच्या यश अपयशांमध्ये धीर देणारे  व तुमच्या यशाने समाजात ताठ मानेने वावरणारे हे तेच माता-पिता असतात जे सदैव तुमच्या हिताची, उन्नती, प्रगती आणि वैभव संपन्न जीवनाची स्वप्ने पाहत असतात. तुमच्या आई-बापा पैकी आई सदैव व्यक्त होऊ शकते पण बाप समजून घ्यावा लागतो, तुम्ही प्रत्येकानी बाप समजून घ्या.  मुलींनी समाजात वावरत असताना आपल्या बापाची मान सदैव ताठ कशी राहील असेच वर्तन ठेवा व यशस्वी प्रगती करा. याप्रसंगी प्राध्यापक हंकारे यांनी  मोबाईल वापराविषयीही सर्वांनाच अनेक कान पिचक्या दिल्या. विशेष महत्त्वाचे म्हणजे या व्याख्यानात प्राध्यापक हंकारे यांनी प्रत्येक उदाहरण देत असताना छत्रपती शिवराय ,माँ जिजाऊ, छत्रपती संभाजीराजे ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, ताराराणी व इतर अनेक युगपुरुषांच्या जीवन चरित्रातील अनेक कष्टप्रद संघर्षाची, चैतन्यशील व निष्ठावान ऐतिहासिक प्रसंगाची दृश्य उभी करून धर्म,राष्ट्र, स्वराज्य व निष्ठा यासाठी आपले जीवन पणाला लावून  या युगपुरुषांनी कसे यशस्वी परिवर्तन घडवून आणले व विश्वापुढे दैदीप्यमान आदर्श उभा केला व स्वतःआदर्श कसे ठरले हे उदाहरणासहित स्पष्ट दाखवून दिले. याप्रसंगी, मागील सोळा वर्षात प्राध्यापक गोरख खटके यांनी यशोदीपच्या माध्यमातून केलेल्या शैक्षणिक प्रगती बद्दल आमदार संजय मामा शिंदे व प्रमुख व्याख्याते वसंत हंकारे यांनी खटके सरांना धन्यवाद दिले व त्यांच्या या नेत्रदीपक यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त  केल्या.
      याप्रसंगी या 2023 मधील यूपीएससी व एमपीएससी मधील यशस्वी अधिकाऱ्यांचा तसेच परिसरातील शाळा महाविद्यालयातील दहावी बारावी  यशस्वी विद्यार्थ्यांचा आमदार संजय मामा शिंदे व इतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यथोचित गुणगौरव सन्मान करण्यात आला .सूत्रसंचालन सुदर्शन पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन राजाभाऊ खटके यांनी मानले. या कार्यक्रमास टेंभुर्णी, बेंबळे, आढेगाव,आलेगाव, तांबवे, सापटणे भिमानगर व परिसरातील शाळा महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी व अनेक प्रतिष्ठित मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा