*टेंभुर्णी ग्रामपंचायत निवडणूक लढवणार..... योगेश बोबडे*
टेंभुर्णी/प्रतिनिधी
टेंभुर्णी ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झालेला आहे, हा प्रोग्राम जाहीर होण्यापूर्वी तसेच जाहीर झाल्यानंतरही आम्ही या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीररीत्या घेतला. टेंभुर्णी नगरपंचायत व्हावी ही आमची आजची भूमिका नसून सन 2016 साली ग्रामसभेचा ठराव करून घेऊन त्यावेळी आमच्या प्रयत्नाला सुरुवात केली होती व आजही ती कायम आहे.
आम्ही बहिष्काराची भूमिका घेतल्यानंतर बोबडे पार्टीच्या कोणीही कोठेही निवडणूक लावण्यासाठी शनिवार दि. 14/10/2023 पर्यंत प्रयत्न केलेले नाहीत ( प्रयत्न केले असल्यास कोणीही सिद्ध करून दाखवावे, हवी ती राजकीय किंमत मोजण्यासाठी तयार आहे ) परंतु आज काही लोक सोशल मीडियावरती टेंभुर्णी ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात रोज पोस्ट टाकून ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याची भाषा करीत आहेत तर काही लोक ( बहिष्कारासाठी घेतलेल्या मिटींगला उपस्थित असूनही ) ग्रुप करून वेगवेगळ्या भागात फिरून उमेदवार शोधत आहेत... हे लोक कोणत्या गटाशी संबंधित आहेत, यांना पक्षाची पदे कोणी दिली हे सर्वांनाच माहीत आहे मग यांना खरंच बहिष्कार टाकायचा असेल तर थांबवायचे काम कोणाचे आहे? ( त्यांना थांबविण्यासाठी शुक्रवार संध्याकाळ पर्यंतचा वेळ देण्यात आलेला होता )
या सर्व कृती मधून त्यांचे फसवाफसवीचे राजकारण दिसून येत असल्यामुळे व अशा लोकांवर यापुढे विश्वास ठेवणे कठीण आहे. पुन्हा तीच लोकं सत्तेच्या खुर्चीत बसणार व गोरगरीब मायबाप जनतेची त्याच पद्धतीने पिळवणूक करणार... केवळ आणि केवळ गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठीच आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीचा बहिष्काराचा निर्णय मागे घेऊन टेंभुर्णी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत आहोत. कोणालाही अंधारात ठेवून वेगळे राजकारण करत बसण्यापेक्षा आमचा निर्णय आम्ही जाहीरपणे प्रसिद्ध करीत आहोत.
----- योगेश बोबडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा