Breaking

शनिवार, १८ मे, २०२४

बेंबळे येथील ट्रॅक्टर चोरीला गेलेला टेंभुर्णी पोलीसांनी चोरट्यासह ट्रॅक्टर केला जप्त आरोपीस 20 पर्यंत पोलीस कोठडी


बेंबळे येथील ट्रॅक्टर चोरीला गेलेला टेंभुर्णी पोलीसांनी चोरट्यासह ट्रॅक्टर केला जप्त  आरोपीस 20 पर्यंत पोलीस कोठडी 
टेंभुर्णी,ता.18 : माढा तालुक्यातील  बेंबळे  येथील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लावलेला सुमारे अडीच लाख रूपये किंमतीचा  ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या अजय दादासाहेब ताकतोडे ( वय- 23 रा.बेंबळे ता.माढा) या आरोपीस टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडले असून त्याच्याकडून चोरून नेलेला ट्रॅक्टर जप्त केला आहे.
 या आरोपीस माढा न्यायालयासमोर हजर केले असता सोमवार (ता.20) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश माढा न्यायालयाने दिले आहेत. 
टेंभुर्णी पोलीस सरांकडून सविस्तर मिळालेली माहिती अशी की दत्तात्रय लक्ष्मण भगत (वय-49 बेंबळे ता.माढा) यांचा शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लावलेला महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर (एमएच- 45/ एफ 1353) हा 3 मे 2024 रोजी चोरून नेला होता. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
 या दरम्यान ट्रॅक्टर चोरी संदर्भात टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, सहाय्यक पोलीस फौजदार विलास रणदिवे, पोलीस हवालदार विलास नलवडे, संदीप गिरमकर,  पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम माने-देशमुख, यांच्या पथकाने संशयित आरोपी अजय दादासाहेब ताकतोडे यास ताब्यात घेऊन गुन्ह्यासंदर्भात सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन शेतात लपवून  ठेवलेला ट्रॅक्टर पोलीसांना नेऊन दाखविला.पोलीसांनी ट्रॅक्टर जप्त केला व आरोपी अजय ताकतोडे यास अटक केली. माढा न्यायालयात संशयित आरोपीस हजर केले असता माढा न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी.व्ही गांधे यांनी सोमवारपर्यंत संशयित आरोपीस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा