Breaking

शुक्रवार, ९ मे, २०२५

बोअरमधील विद्युतपंप काढत असताना दावं तुटून डोक्याला लाकूड लागल्याने बिटरगावात महिलेचा दुर्दैवी मृत्यू


बोअरमधील विद्युतपंप काढत असताना दावं तुटून डोक्याला लाकूड लागल्याने बिटरगावात महिलेचा दुर्दैवी मृत्यू


करमाळा : शेतात बोअरमधील विद्युतपंप काढत असताना दावं तुटल्याने लाकूड डोक्याला लागल्याने बिटरगाव श्री येथे ३४ वर्षाच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मनीषा नितीन मुरूमकर असे या महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चायत दोन मुलं, एक मुलगी, पती, सासू व सासरे असा परिवार आहे. बिटरगाव श्री विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष लालासाहेब मुरूमकर यांची सून व पत्रकार अशोक मुरूमकर यांच्या त्या चुलत भावजयी होत्या.

मनीषा मुरूमकर या पती नितीन मुरूमकर व लहान मुलगा यांच्याबरोबर सोमवारी (ता. ५) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास शेतात बोअरमधील विद्युतपंप काढण्यासाठी गेल्या होत्या. बोअरवेलमधील विद्युतपंपाचे दावे टीपाडावरून ट्रॅक्टरला बांधून ओढायचा प्रयत्न सुरु असताना दावे तुटले आणि त्यातील लाकूड मनीषा मुरूमकर यांच्या डोक्याला लागले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या.

मनीषा मुरूमकर यांचा लहान मुलगा जवळच होता. मोठा मुलगा काळा पाईप धरून ओढत होता. एकजण बोअरमधील केबल धरत होता. दरम्यान दावे तुटून मुरूमकर यांच्या डोक्याला लाकूड लागले. त्यानंतर त्यांना तत्काळ माजी सरपंच शिवाजी मुरुमकर, वैभव मुरूमकर, मधुकर शिर्के, भाऊसाहेब बाबर, गणेश बाबर यांनी करमाळा येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार करून त्यांना अहिल्यानगर येथे दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असताना बुधवारी (ता. ७) तेथील खासगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. बिटरगाव श्री येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. शुक्रवारी (ता. १६) संगोबा येथे त्यांचा दशक्रियाविधी होणार आहे.


मुरूमकर यांच्या या अपघाती निधनामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्या अतिशय मनमिळावू होत्या. त्यांचे सासर हे बिटरगाव श्री येथील होते. माजी सरपंच शिवाजी बाबर यांची त्या मुलगी होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा