*माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यावरील गुन्ह्याची फेर चौकशी करा - शोभा माळी*
माजी नगराध्यक्षा शोभा माळी यांच्या सह महिला नगरसेविकांचे पोलिसांना निवेदन
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
पडळ ता. खटाव येथील के.एम. शुगर कारखान्यात ज्या वेळी गुन्हा घडला त्या काळात माजी आमदार प्रभाकर घार्गे पक्षाच्या विविध कामात कार्यरत होते, आधी समाज कारण, मग राजकारण असं धोरण गेली अनेक वर्षे स्वतः प्रभाकर घार्गे राबवित आले असून कोणीही टीका केली तरी त्या व्यक्तीला घार्गे यांनी आजअखेर तीव्र शब्दांत प्रतिउत्तर दिले नाही, अशा निरपराध सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीवर पडळ ता खटाव येथील कारखाना प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे, या गुन्ह्याचा फेरविचार करण्याची मागणी वडूज नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा शोभा माळी व महिला नगरसेविकीनी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांना लेखी निवेदनाद्वारे केला आहे.
या निवेदनात माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यावरील गुन्ह्याची फेरचौकशी होणेबाबत लेखी मागणी केली असून पडळ येथील के. एम. शुगर साखर कारखान्यातील थोरात नावाच्या अधिकाऱ्याचा मारहाणीने मृत्यु झाल्याबाबत १८ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या नावाचाही समावेश आहे. आजपर्यंत गेली अनेक वर्षे तालुक्यातील जनता प्रभाकर घार्गे यांना जवळून ओळखत आहे. समोरच्या कोणत्याही व्यक्तीला आरे, कारे ची भाषाही त्यांनी आजपर्यंत कधीही केली नाही. भाषणात सुध्दा ते कधीही कठोर शब्दात टिका करत नाहीत. आपल्या आमदार फंडातून लाखो रुपयांची विकासकामे श्री घार्गे यांनी केली आहेत. त्याचबरोबर दुष्काळात चारा छावणीच्या माध्यमातून शेकडो मुक्या जनावरांचे प्राण वाचविणारे श्री. घार्गे हे स्वत: एखाद्या मनुष्याच्या जीवावर उठणे कदापी शक्य होणार नाही. तरीही कारखान्याचे संस्थापक चेअरमन या पदावर आहेत म्हणून त्यांच्यावर खूनासारखा गंभीर आरोप करणे अत्यंत गैर व चुकीचे आहे. त्यामुळे या गुन्ह्याची फेरचौकशी करुन त्यांच्यावरील गुन्हा तातडीने मागे घेण्यात यावा असे ही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर नगरसेविका सुनीता कुंभार, काजल वाघमारे, सुवर्णा चव्हाण, नीता संदीप गोडसे आदिच्या सह्या आहेत. यावेळी नगराध्यक्ष सुनिल गोडसे, नगरसेवक संदीप गोडसे, सचिन शेठ माळी, राजू चव्हाण, अमोल वाघमारे आदींची उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा