टेंभुर्णी एम.आय.डी.सी तील लोखंड चोरीप्रकरणी सात आरोपींना अटक
14 लाखाचा मुद्देमाल जप्त
टेंभुर्णी (प्रतिनिधी)
गेल्या महिन्यातील दहा तारखेला टेंभुर्णी एमआयडिसी येथे बांधकाम सुरू असलेल्या कंपनीतील साडेआठ लाख रुपये किमतीचे लोखंड चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्या घटनेतील सात आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून. तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. पकडलेल्या आरोपींकडून १३ लाख ९३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी दिली
याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्या कडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की टेंभुर्णी येथील एमआयडीसी मध्ये एका कंपनीचे इंडस्ट्रियल बांधकाम सुरू होते. त्या बांधकाम साईटवरील ०४ लाख १० हजार ४१० रुपये किंमतीचे ११ पी ई बी फॅब्रिकॅटेड लोखंडी कॉलम व ०३ लाख ४९ हजार ३२० रुपये किमतीचे १२ फॅब्रिकॅटेड लोखंडी राफ्ट असे एकूण ०८ लाख ४७ हजार ६० रुपये किंमतीचा माल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद अमर कृष्णा देशमुख (रा पुणे) यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यांमध्ये दिली होती.
सदर गुन्ह्याचा तपास केला असता पोलिसांना त्यांचे गुप्त बातमीदारा कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे समाधान नारायण कोल्हे (वय २६) नवनाथ भगवान खटके (वय५६)दोघेही रा टेंभुर्णी व रमेश बजरंग मिस्कीन (वय २७ रा बेंबळे) या तिघांना ०१ एप्रिल रोजी अटक केली. त्यानंतर सदर संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत.पोलिसी खाक्या दाखवताच इतर आरोपींची नावे सांगितली. सदर गुन्ह्यातील लोखंडी माल किरण शंकर ढगे याच्या कडील कटरने कट करून देविदास बबन चिंतामण यास क्रेनच्या साह्याने ट्रकमध्ये भरून विकण्यासाठी दिला होता. देवीदास चिंतामणी यास ०९ एप्रिल रोजी अटक केल्यानंतर त्याने चोरी केलेला माल नंदकुमार अशोक माने (वय २७ रा मंगळवेढा) व निखिल दीपक जगताप (रा बंबळे) यांच्या साहाय्याने जालना येथे नेऊन विकला असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे १० एप्रिल ला नंदकुमार अशोक माने यास अटक करून त्याच्याकडून
या गुन्ह्यातील चोरी गेलेले ११ फॅब्रिकॅटेड लोखंडी कॉलम व १२ फॅब्रिकॅटेड लोखंडी राफ्टर असा एकूण ७ लाख ७९ हजार ७३० रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच १० हजार रुपये किमतीची मोठी ऑक्सिजन गॅस टाकी,१५०० रुपये किमतीची इंडियन गॅस लाल रंगाची टाकी,१५०० रुपये किमतीचा गॅस कटर ३०० रुपये किमतीचा गॅस पाईप व गुन्ह्यात वापरलेला ६ लाख १३ हजार ३०० रुपये किमतीचा मालट्रक (एम एच.१३.ए.क्स.३९९३) असा एकूण १३ लाख ९३ हजार ३० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
सदर गुन्ह्यातील सुभाष गुळमे,नामदेव भंडारे व भैय्या कुंभार हे तीन आरोपी अद्यापही फरार असल्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले.
सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,करमाळ्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, बजरंग बोराटे,ठोंबरे,विजय डोंगरे,भाऊसाहेब पवार, केशव झोळ,योगेश चितळे,सचिन ननवरे यांनी पार पाडली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा