Breaking

शनिवार, २२ मे, २०२१

माढा व करकंब ग्रामीण रुग्णालयाचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये समावेश होणार - आमदार बबनदादा शिंदेराज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्याशी सकारात्मक चर्चा



माढा व करकंब ग्रामीण रुग्णालयाचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये समावेश होणार - आमदार बबनदादा शिंदे

राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्याशी सकारात्मक चर्चा 


माढा / प्रतिनिधी - महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये माढा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालय माढा व करकंब यांचा समावेश होण्याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री नामदार डॉ.राजेश टोपे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून येत्या आठवडाभरात ही योजना या दोन्ही ठिकाणी लागू होईल याचा गोरगरीब व गरजू आणि सामान्यांना कोव्हिड -19 व इतर आजारावरील उपचारासाठी नक्कीच फायदा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली. 

माढा  विधानसभा मतदारसंघात मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना माढा व करकंब येथील ग्रामीण रुग्णालयात सुरु करण्यासाठी आ. बबनदादा शिंदे यांनी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला होता. त्याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर फोनव्दारे चर्चा झाल्यानंतर नामदार राजेश टोपे याबाबत सकारात्मक असून ही योजना आठवडाभरात या दोन्ही ठिकाणी सुरु करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. 
या योजनेत समावेश असलेल्या रोगांवर दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार या योजनेंतर्गत मोफत करता येतात यासाठी संबंधित रुग्णाकडे  पिवळे व केशरी रेशनकार्ड किंवा तहसीलदार यांचे रहिवास प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक कागदोपत्री पुरावा असणे आवश्यक आहे.

माढा व करकंब येथील ग्रामीण रुग्णालयात सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर असून या ठिकाणी इतरही वैद्यकीय साधने व सुविधा उपलब्ध आहेत. या ठिकाणी संबंधित आजारांचे तज्ञ डाॅक्टर्स उपलब्ध करुन रुग्णांवर शस्त्रक्रिया व नंतरचे उपचार करण्यात येतील. यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू रुग्ण आणि त्यांच्या कुटूंबातील सदस्यांची होणारी आर्थिक परवड व मानसिक हेळसांड थांबण्यास मदत होणार असल्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले आहे.

फोटो ओळी - आमदार बबनदादा शिंदे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा