समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव यांना नवभारत राज्यस्तरीय एज्युकेशन पुरस्कार
माढा / प्रतिनिधी- माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीचे रहिवासी व सध्या सोलापूर येथे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी म्हणून कार्यरत असणारे संतोष प्रकाश जाधव यांना नवभारत राज्यस्तरीय एज्युकेशन पुरस्कार जाहीर झाला असून त्याचे वितरण मुंबई येथील विले-पार्ले येथे 30 ऑगस्ट रोजी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते आणि खासदार सुप्रियाताई सुळे, गृहराज्यमंत्री सतेज पाटील व राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
विठ्ठलवाडी येथील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या संतोष जाधव यांनी शैक्षणिक अर्हता प्राप्त करून 1996 साली प्राथमिक शिक्षक म्हणून शासकीय सेवेला प्रारंभ केला त्यानंतर जिद्द व चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश मिळवून 2007 साली शिक्षण विस्ताराधिकारी पदावर बार्शी तालुक्यात रुजू झाले.एवढ्यावरच न थांबता शासकीय सेवेत एखादे मोठे पद मिळविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले आणि सन 2012 मध्ये शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या उस्मानाबाद व सोलापूर येथील जात पडताळणी विभागात ते रुजू झाले.त्याठिकाणी उत्तम रीतीने कामकाज केल्यामुळे त्यांची मागील वर्षी सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारीपदी नियुक्ती झाली.त्यांचा प्राथमिक शिक्षक ते जिल्हा समाजकल्याण अधिकारी हा यशस्वी प्रवास निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे.या कालावधीत त्यांनी दिव्यांग व मागासवर्गीय विद्यार्थी आणि गरजू लोकांकरिता शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली त्याची दखल घेत त्यांना या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील लोकांकडून अभिनंदन होत आहे.
फोटो ओळी- समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा