*वडूज येथे रक्षाबंधनसाठी आलेल्या महिलांना शिवसैनिक बंधूनी दिला आधार*
आगार व्यवस्थापक कुलदिप डुबल यांचे ही मोलाचे सहकार्य
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
रक्षाबंधनासाठी सासर येथून खटाव तालुक्यातील आपल्या भावाला राखी बांधावी या उद्देशाने अनेक माहेरवाशीण आपल्या माहेरी आल्या होत्या. खटाव तालुक्यातील वडूज येथील बस स्थानकात सकाळ पासून महिला वर्गाची गर्दी झाली होती. पण, दुपारपर्यंत काही गावच्या मार्गावर एस टी बस सेवा नसल्याची माहिती मिळाली. तेव्हा पुन्हा सासरी जाण्याचा निर्णय काही महिलांनी घेतला परंतु, वडुज नगरीतील शिवसैनिकांनी बंधूंचे कर्तव्य म्हणून खाजगी वाहन व्यवस्था करून 'शिवबंधन' पाळले.
याबाबत माहिती अशी की, कोरोनाचे संकटामुळे मागील वर्षी काही महिलांना रक्षाबंधन साजरा करण्याची इच्छा असुनही केंद्र व राज्य सरकारच्या कडक नियमामुळे घराबाहेर पडता आले नाही. मात्र, या वर्षी सार्वजनिक वाहतूक सुरू झाल्याने वडूज बस स्थानकात महिला भगिनींची मोठी गर्दी झाली होती, वडुज आगर प्रमुख कुलदीप डूबल यांनी रक्षाबंधन निमित्त सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, अक्कलकोट, परळी- वैजनाथ या भागात नियमित व ज्यादा एस टी बस गाड्या सोडल्या होत्या. परंतु,खटाव तालुक्यातील स्थानिक पातळीवर आजूबाजूच्या परिसरात जाण्यासाठी बस सेवा नसल्याने तसेच रक्षाबंधन निमित्त अनेकजण दुचाकी व चारचाकी वाहन घेऊन आपल्या घरातील महिलांना रक्षाबंधन साठी घेऊन गेले होते. अशावेळी एस टी बस व खाजगी वाहने उपलब्ध होत नव्हती. वडूज बस स्थानकातच काही महिलांना ताटकळत उभे राहावे लागले होते. नाईलाजास्तव काहींनी परत सासरी जाण्याचा निर्णय घेतला. ही बाब जेष्ठ पत्रकार अजित जगताप, पत्रकार शरद कदम, शिवसेना खटाव तालुका उपप्रमुख महेश गोडसे, विभागप्रमुख आबासाहेब भोसले यांना समजताच त्यांनी सदरच्या महिलांना दिलासा देऊन वाहनांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. रक्षाबंधन दिवस असल्याने वाहने लवकर उपलब्ध झाली नाहीत. काही वेळाने एक चारचाकी उपलब्ध झाल्यानंतर त्या महिलांना माहेरी सुखरूप सोडण्यात आले. आपली मुलगी सुखरूप घरी आल्याने माहेरच्यांनी शिवसैनिकांचे व आगार व्यवस्थापक डुबल साहेबांचे आभार मानले.
दरम्यान, वडूज एस टी आगारा येथून सातारा ५६ , पुणे ७, रहिमतपूर मार्गी १२, सांगली ७ व इतर ठिकाणी मिळून १०० एस टी बसेस वडूज स्थानकातून सोडण्यात आल्या होत्या. या मधून एस टी महामंडळाला ३ लाख रुपयांचे ज्यादा उत्पन्न मिळाल्याची माहिती वडूज आगार व्यवस्थापक कुलदीप डूबल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी एन जे कुचेकर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा